बीड : जिल्ह्यात कोरोना लसींचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवत आहे. आरोग्य विभागाने शासनाकडे एक लाख डोसची मागणी केली होती. परंतु, दोन दिवसांपासून एकही डोस मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १४३ पैकी केवळ ७ केंद्रांवर बुधवारी लसीकरण झाले. तब्बल १३६ केंद्रे लस नसल्याने बंद ठेवण्याची वेळ आरोग्य विभागावर आली होती. यामुळे लस घेण्यासाठी आलेल्यांचा रिकामा हेलपाटा झाला.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंतेचा विषय बनत आहे. त्यातच कोरोना लस घेण्याचे आवाहन केले जात असल्याने आणि लोकांच्या मनातील सर्व गैरसमज दूर झाल्याने लाभार्थी लस घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर्स, दुसऱ्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर्स, तर तिसऱ्या टप्यात ४५ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिल्हाभरात जवळपास नऊ लाख लाभार्थी आहेत. एवढे लाभार्थी असूनही आतापर्यंत केवळ दोन लाख १७ हजार लोकांनी लस घेतली आहे. अद्यापही सात लाख लाभार्थी पहिल्या टप्प्यातील बाकी आहेत. आरोग्य विभागाकडून उद्दिष्ट पूर्ण करण्यासह नागरिकांना लस देण्याचा उत्साह असला तरी डोसच उपलब्ध नसल्याने त्यांचा नाइलाज झाला आहे. बुधवारी तर केवळ तीन हजार डोस शिल्लक होते. आता रात्री उशिरापर्यंत डोस न मिळाल्याने आज, गुरुवारी लसीकरण होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. लस उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या केंद्रांवर दिली लस
जिल्हा रुग्णालय, पोलीस हॉस्पिटल आणि येळंबघाट आरोग्य केंद्रात पहिला डोस देण्यात आला, तर धारूर, सादोळा, किट्टी आडगाव आणि येळंबघाट येेथे केवळ दुसरा डोस उपलब्ध होता. आता या केंद्रांवरीलही लस संपल्याने अडचण निर्माण झाली आहे.
खासगी केंद्रांचीही वाढणार संख्या
१ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्यात येणार आहे. होणारी गर्दी आणि केंद्रांची अपुरी संख्या पाहता खासगी लोकांनाही केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांची शिफारस घेऊन जिल्हा टास्क फोर्सकडे प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. त्यानंतर जिल्हा समिती यावर निर्णय घेऊन परवानगी देणार आहे.
..
एक लाख डोसची मागणी केलेली आहे. बुधवारी तीन हजार डोस शिल्लक होते. आता जेव्हा शासन लस देईल, त्याप्रमाणे केंद्र सुरू करण्यात येतील.
-डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, बीड.
----
अशी आहे लसीकरणाची आकडेवारी
हेल्थ केअर वर्कर्स १५७७०
फ्रंटलाईन वर्कर्स २६५६४
ज्येष्ठ नागरिक ९७८३५
कोमॉर्बिड आजार ३९६३१
----
पहिला डोस- १७९८००
दुसरा डोस- ३७६४२
एकूण लसीकरण- २१७४४२