लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आषाढी एकादशीनंतर शेगावकडे परतीला निघालेल्या संत श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी श्री क्षेत्र कपिलधारमध्ये आगमन झाले. मन्मथ स्वामींच्या सान्निध्यात श्रींचा पालखी सोहळा रंगला. टाळ आणि भजनामुळे फुललेल्या भक्तीमय वातावरणात तल्लीन होऊन भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. ‘गण गण गणांत बोते’, ‘मन्मथस्वामी महाराज की जय’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला. मंगळवारी पालखी सोहळ्याचे बीड शहरात आगमन होत असून स्वागतासाठी भाविक सज्ज झाले आहेत.आषाढीला विठूरायाचे दर्शन घेऊन १६ जुलै रोजी पंढरपुरहून शेगावकडे पालखीचे प्रस्थान झाले. २१ जुलै रोजी बीड तालुक्यातील चौसाळा येथे मुक्कामानंतर २२ रोजी चौसाळा, उदंड वडगाव मार्गे पालखीचे सकाळी अकरा वाजता मांजरसुंबा येथून श्रीक्षेत्र कपिलधार येथे आगमन झाले.यावेळी मंदिर परिसरात रांगोळी काढून आतषबाजी करु न पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. संत शिरोमणी मन्मथस्वामी मंदिराच्या प्रवेशद्वारावर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व भाविकांनी सपत्नीक गजानन महाराजांच्या पालखीचे पूजन केले, त्यानंतर महाआरती झाली. मंदिराच्या गाभाऱ्यात संत मन्मथस्वामींच्या संजीवन समाधीसमोर पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. दुपारी दीड वाजता पालखी पालीच्या दिशेने मार्गस्थ झाली.डाळबाटीचा महाप्रसादशेगाव राणा संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षी श्रीक्षेत्र कपिलधार येथे दाखल होते.कपिलधार देवस्थान व मित्र परिवाराच्या वतीने पायदळवारीतील ७५० वारकऱ्यांसाठी डाळबाटीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते.कपिलधार देवस्थानचे पदाधिकारी व स्वयंसेवक दोन दिवसांपासून पालखीच्या स्वागतासाठी तयारी करत होते.महामार्गावर पोलीस सजगराष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस सजग होते. नेकनूर ठाण्याचे पोनि काळे, भाऊ वाघमारे, रवींद्र जाधव सह १५ कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी सूर्यकांत सूळ, अनिल तांदळे, किशोर जाधव, फुलचंद जाधव, गोरख राठोड, सुनील जाधव, जयराम उबे, फारुक शेख आदी कर्तव्यावर होते.
मन्मथस्वामींच्या सान्निध्यात श्रींचा पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:57 AM