बीड: खासदार श्रीकांत शिंदेंवर हत्येची सुपारी दिल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांना भोवले आहे. येथील शहर पोलीस ठाण्यात खा.राऊत यांच्याविरुद्ध २२ फेब्रुवारीला बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी याबाबत फिर्याद दिली.शिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यापासून आरोप- प्रत्यारोप रंगले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत खासदार श्रीकांत शिंदेंवर सनसनाटी आरोप केला आहे. कुख्यात माफिया राजा ठाकूर यास आपल्या हत्येची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिली होती, या राऊत यांच्या आरोपाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.
दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी २२ रोजी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. शिवाय शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, रात्री उशिरा सचिन मुळूक यांनी दोन पानी फिर्याद दिली, त्यावरुन खा. राऊत यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.नि.रवी सानप करत आहेत.