अंबाजोगाई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. एरवी सतत माणसामुळे गजबजणाऱ्या बसस्थानकात अचानकच निर्मनुष्यता व शुकशुकाट जाणवू लागला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. बससेवा बंद असल्याचा मोठा फटका सामन्य नागरिकांना बसू लागला आहे. ग्रामीण भागातील नागिरकांना रुग्णालयात येण्यासाठीही वाहन उपलब्ध नाही. खासगी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे. हक्काचे वाहन असलेली बस वाहतूकही बंद झाल्याने बसस्थानकात शुकशुकाट जाणवू लागला आहे.
पाणपोईची गरज
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे तापमानात वाढ होत चालली आहे. वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. अशास्थितीत वाढत्या उन्हात अत्यावश्यक सेवा देणारी पोलीस यंत्रणा रस्त्यावर बंदोबस्तासाठी ठाण मांडून आहे. सर्व उपाहारगृह व हॉटेल, टपऱ्या बंद असल्यामुळे कडक उन्हात बंदोबस्त करणाऱ्या पोलीसबांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानक परिसर, शिवाजी चौक व शहरातील मुख्य परिसरात पाणपोईची नितांत आवश्यकता आहे.
पाणी आहे पण लाईट गूल, उभी पिके संकटात
अंबाजोगाई : तालुक्यात महावितरणच्या वतीने केला जाणारा विद्युत पुरवठा सतत खंडित होतो. जिथे वीज पुरवठा सुरू आहे, तिथे अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे विद्युत पंप चालत नाही. त्यामुळे शेतातील ऊस, भाजीपाला व विविध पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत.
कोरोनाचे संकट व त्यामुळे लावण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. बिल भरण्याची स्थिती नसताना वीज मंडळाने सक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोरगावकर यांनी केली आहे.
प्रोत्साहन रक्कम कधी होणार जमा
अंबाजोगाई : राज्य शासनाने नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले होते. एक वर्ष लोटून गेल्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. ती तातडीने जमा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुलकर्णी यांनी केली आहे.