- नितीन कांबळे
कडा : नगर जिल्ह्यातील मढी, केळवंडी, करडवाडी या ठिकाणी तीन बालकांचा फडशा पडल्यानंतर आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास वन विभागाने अखेर जेरबंद केले आहे. बुधवारी मध्यरात्री आष्टी तालुक्यातील सावरगांव परिसरातील सटवाईच्या डोंगरात भक्ष्यासाठी बाहेर पडलेला बिबट्या वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात अडकला.
नरभक्षक बिबट्याचा आष्टी तालुक्यात संचार झाल्याने येथील नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. यानंतर वनविभागाने विविध ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्याची तयारी सुरु केली होती. यासाठी औरंगाबाद, नगर, नाशिक, जळगाव, आष्टी येथील वनविभागाचे कर्मचारी आठ दिवसांपासून डोळ्यात तेल घालून सापळ्यावर लक्ष ठेऊन होते. बुधवारी मध्यरात्री हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात बाहेर पडला. गर्भागिरी डोंगरपट्यातील सटवाईच्या डोगराकडे निघालेला बिबट्या वन विभागाने लावलेल्या एका पिंजऱ्यात अडकला.
नरभक्षक बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. दहशत पसरवणारा बिबट्या पकडण्यात आल्याने दिलासा मिळाला असल्याचे सावरगांवचे सरपंच राजेंद्र म्हस्के सांगितले. तर नागरिकांनी नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केले. दरम्यान, बिबट्यास वैद्यकीय तपासणीसाठी नगरकडे नेण्यात आले असून त्यानंतर त्यास निवारण केद्रात दाखल करण्यात येईल अशी माहिती अहमदनगरचे साहायक वनरक्षक एस. एफ. सोनवणे यांनी दिली आहे.