- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद ) : कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दोन वर्षाचा खंड पडल्यानंतर यावर्षी भरलेल्या मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. भाविकांच्या संख्येत जवळपास ६० ते ७० टक्के घट झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये बंद केलेली गळ टोचणीची प्रथा यावर्षीही बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
भारतातील प्रसिद्ध यात्रांपैकी एक असलेली औरंगाबाद तालुक्यातील शेंद्रा कमंगर येथील मांगीर बाबा यात्रा. कोरोना परिस्थितीमुळे मागील दोन वर्षापासून ही यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोना ओसरल्याने यात्रा पूर्ण क्षमतेने भरविण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. २०१९ ला पहिल्यांदा गळ टोचणी प्रथा बंद करण्यास देवस्थान समिती, ग्रामपंचायत तसेच प्रशासकीय यंत्रणा यांना यश आले होते. त्यानंतर यावर्षी होणाऱ्या यात्रेत देखील गळ टोचणी पूर्णपणे बंद आहे.
भाविक आपला नवस फेडण्यासाठी या ठिकाणी गळ टोचून घेत असत. ही गळ टोचणीची कुप्रथा बंद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून यात्रा रद्द होत आहे. तसेच वाढते तापमान या कारणांमुळे भाविकांची संख्या घटली असावी असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, उद्या भाविकांची संख्या वाढू शकते असा अंदाज देवस्थान समितीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.