लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोरेगाव भीमा प्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बीड जिल्ह्यात सर्वत्र याला प्रतिसाद मिळाला. व्यापारी, नागरिकांनी सहभाग नोंदवून बंदला पाठिंबा दिला. अनेक ठिकाणी मोर्चा काढून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांना दिले. बंदमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने चौकाचौकात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे बंद शांततेत झाला.
बीड शहरात सोशल मीडियावरून काहींनी पंचायत समिती परिसरात तीन वाहने जाळल्याची अफवा पसरवल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. पोलिसांची वाहने पंचायत समितीच्या दिशेन धावत होती. त्यामुळे या ठिकाणी काही तरी झाले असेल, असे समजून मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी पाहिले असता याठिकाणी एकच वाहन जळाल्याचे दिसले. याचे कारण पोलीस शोधत आहेत.
परंतु सोशल मीडियावर मात्र एक नव्हे तर तीन वाहने जाळल्याची अफवा पसरवली होती. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, नानासाहेब लाकाळ, पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांनी घटनास्थळी भेट दिली. ही केवळ अफवा असल्याचे खिरडकर यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी याची गंभीर दखल घेत अफवा पसरवणाºयांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
बससेवा ठप्प; प्रवाशांचे पुन्हा हालमंगळवारी दुपारी १२ वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत बससेवा ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. रात्री ७ नंतर पोलिसांनी संरक्षणात बसेस बीडच्या बाहेर काढल्या. बुधवारी सकाळी पुन्हा बससेवा ठप्प झाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत बसेस स्थानकांमध्येच उभ्या होत्या. दोन दिवस सेवा ठप्प असल्यामुळे रापमला मोठा आर्थिक फटका बसला असून प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. तसेच आतापर्यंत १४ बस गाड्या फोडल्या असून नुकसानीचा आकडा घेत असल्याचे विभागीय नियंत्रक जी.एम.जगतकर म्हणाले.
रात्रभर गस्त; बंदोबस्त तैनातजिल्ह्यात सर्वत्र पोलिसांकडून मंगळवारी रात्रभर गस्त घालण्यात आली. तसेच संवेदशनशील ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. तर इतर चौकांमध्येही बंदोबस्त लावला होता. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे हे गस्तीवर होते.