लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मातृ-पितृ छत्र हरवलेल्या परजातीच्या निराधार मुलीसोबत संसाराची गाठ बांधून शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकर याने नवा आदर्श ठेवला. मंगळवारी येथील सहयोगनगरमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात लक्ष्मीकांत आणि मनिषाचा शुभमंगल सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत विधिवत पार पडला. रक्ताच्या नात्याने कोणीही नसलेले परंतु, माणुसकीचा धागा विणणाºयांकडून मिळालेले प्रेम यामुळे आयुष्यात उमेद हरवत असताना मनिषाला मोठा आधार झाला.
लहानपणातच आई - वडिलांचे निधन झाले, भाऊ ऊसतोड कामगार पण बहिणीचा सांभाळ करण्यास असमर्थ, कोणीही नातेवाईक सांभाळत नव्हते. आत्याचा आधार मिळाला पण तोही आयुष्यातील प्रश्न वाढविणारा ठरला, आत्याही देवाघरी गेली. अशा परिस्थितीत अध्यक्ष एस. बी. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत ग्रामीण विकास मंडळाची मदत मिळाली. तेथे दोन वर्षाच्या वास्तव्याने सक्षम बनल्यानंतर संस्थेने पितृत्वाची भूमिका पार पाडली. ग्रामीण विकास संस्थेच्या कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्रात कौटुंबिक अत्याचाराच्या प्रकरणात तडजोड करुन समेट घडविला जातो. समस्याग्रस्त महिला, मुलींचे समुपदेशन, मार्गदर्शन करुन पुनर्वसन केले जाते. अशाच समेट झालेल्या एका महिलेकडून मनिषाची माहिती कळाली. मनिषाला संस्थेच्या आश्रय अल्पमुदती निवासगृहात आणले. तेथून तिच्या नव्या जीवनपर्वाला सुरुवात झाली.
समुपदेशक उषा जाधव यांनी समुपदेशन करुन स्वावलंबी बनण्यासाठी मनिषाला टेलरींगचे प्रशिक्षण दिले. या कामात ती सक्षम बनली. नातेवाईक नसल्याने तिची पुनर्विवाहासाठी मानसिकता तयार केली. नंतर तिच्यासाठी सक्षम जोडीदार शोधणे सुरु झाले. जालना जिल्ह्यातील शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकरचे वडिल शेती करतात. आई अंगणवाडी सेविका आहे. लक्ष्मीकांत औरंगाबाद येथे स्कूलबस चालकाची नोकरी करतो. भाऊ महेंद्र बीडमध्येच प्रज्ञाचक्षू अंध विद्यालयात नोकरी करतात. त्यांनी भावासाठी या संस्थेत विचारणा केली. मुलगा, मुलगी पाहण्याचा टप्पा झाला.
गृहभेटीनंतर दोघांची पसंती झाली. नंतर हा प्रस्ताव संस्थेच्या नेबरहूड व उपसमितीसमोर आला. नऊ सदस्यांच्या बैठकीत मनिषा व लक्ष्मण यांच्या विवाहाबाबत सर्वानुमते निर्णय होऊन परवानगी देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी कन्यादानाची जबाबदारी सांभाळली. लक्ष्मीकांत कुटुंबियांनी लग्नसोहळ्याचे नियोजन केले.
सोमवारी अल्पमुदत निवासगृहात मनिषाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी दोन वर्षात जिवलग झालेल्या सखींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मंगळवारी सर्वेश्वर गणपती मंदिरात महिला व बालकल्याण अधिकारी आर. डी. कुलकर्णी, एस. बी. सय्यद , सचिव टी. के. गायकवाड, सामाजिक कार्यकर्र्तेे गौतम खटोड, डॉ. पौर्णिमा यंदे, डॉ. हेमलता पाटील, अॅड. हेमा पिंपळे, मनिषा तोकले, तत्वशील कांबळे, अशोक तांगडे, सुशील खटोड यांच्यासह शहरातील सामाजिक चळवळीत कार्यरत संस्थांचे पदाधिकारी, शेरकर कुटुंबातील सर्व सदस्य, आश्रय निवासगृहातील मनिषाच्या मैत्रिणी, शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत मनिषा आणि लक्ष्मीकांतचा विवाह थाटात पार पडला. अनेकांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.
- ब्राह्मण समाजात मुलींची संख्या कमी असल्याने समाजापुढे आदर्श ठेवण्यासाठी आम्ही हे परिवर्तनवादी पाऊल कुटुंबातील सर्वांच्या संमतीने उचलले आहे. सामाजिक पातळीवर सर्वमान्यता मिळाल्याचा आनंद आहे.- महेंद्र वसंतराव शेरकर, (वर बंधू)
- माता आणि मातीच्या उन्नतीसाठी २२ वर्षांपासून आमची संस्था कार्यरत आहे. विघटीत कुटुंबांना एकत्र आणण्याइतका दुसरा आनंद नाही. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून २० विवाह लावण्यात आले व त्यांचा संसार सुखात आहे. निराश्रितेला स्विकारुन लक्ष्मण व शेरकर कुटुंबाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. समाजाने पुढाकार घेतल्यास अशा समस्याच राहणार नाहीत.- सय्यद एस.बी., अध्यक्ष,ग्रामीण विकास संस्था.
- सामाजिक पातळीवर विविध कारणांमुळे संकटे येतात. अशा भगिनींसाठी सर्व सामाजिक संस्थांनी पितृत्व, बंधुत्वाच्या भावनेतून पुढे आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. शेरकर कुटुंबियांचे अभिनंदन.- गौतम खटोड, सामाजिक कार्यर्कर्ते, बीड