जास्त आलेले ५० हजार एसबीआयला केले परत : व्यवस्थापनाकडून सत्कार
माजलगाव : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्याच्या नजरचुकीने पन्नास हजार रुपये जास्त देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तालुक्यातील रोषणपुरी येथील प्रतिष्ठित शेतकरी सुखदेवराव बळिराम ताकट यांनी बँकेचे व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याकडे ही रक्कम सोपवत आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. ऑनलाईनच्या जमान्यामध्ये हॅक करून, वेगवेगळ्या पद्धती वापरून अनेकांच्या बँक खात्यामधून हजारो रुपये पळवण्याच्या घटना घडत असताना समाजात सुखदेवरावांसारखी प्रामाणिक माणसे असल्याचा प्रत्यय आला.
सुखदेवराव ताकट हे १३ जानेवारी रोजी बीड रोडवरील एसबीआय शाखेत त्यांचे पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेच्या अधिकाऱ्याने त्यांच्या स्लिपवर ५०० रुपयांच्या ३१४ नोटा असे १,५७,००० रुपये आणि १०० रुपयांच्या २०० नोटा २०,००० असे एकूण १,७७,००० रुपयांचे विवरण चलनवर लिहिले होते. परंतु या अधिकाऱ्याकडून चक्क ३१४ ऐवजी ४१४ नोटा देण्यात आल्या. ५० हजार रुपये जास्त देण्यात आले होते. बँक अधिकाऱ्याकडून ५० हजार रुपये जास्त आल्याचे लक्षात येताच ताकट यांनी बँकेचे व्यवस्थापक संदीप कुमार यांच्याशी संपर्क साधला. ही बाब लक्षात आणून देत जास्तीचे आलेले पन्नास हजार रुपये त्यांना सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल शेतकरी सुखदेवराव ताकट यांचा बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.