बीड : बीडपासून जवळच असलेल्या सह्याद्री वनराई परिसरात होऊ घातलेल्या पहिल्या वृक्षसंमेलनाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता राज्याचे वनमंत्री संजय राठोड, पालकमंत्री धनंजय मुंडे, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत होणार आहे. १३ आणि १४ फेब्रुवारी असे दोन दिवस हे संमेलन चालेल.
पहिल्या वृक्षसंमेलनानिमित्त बुधवारी बीड शहरातून भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली. सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि आ. संदीप क्षीरसागर यांनी झाडांची पालखी खांद्यावर घेतली होती. या दिंडीत शेकडो विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. बीडजवळच असलेल्या पालवन येथील उजाड डोंगरावर वनराईने नटलेला सह्याद्री देवराई प्रकल्प सयाजी शिंदे, अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके आणि वनविभागाच्या परिश्रमातून उभा राहिला आहे. याच ठिकाणी हे वृक्षसंमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वडाचे झाड राहणार आहे. संमेलनानिमित्त बुधवारी सकाळी बीड शहरातून ही वृक्षदिंडी काढण्यात आली.
सयाजी शिंदे, अरविंद जगताप, आ. संदीप क्षीरसागर, शिवराम घोडके यांच्यासह पर्यावरण प्रेमी नागरिक, शेकडो विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. या वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शहरवासियांचे लक्ष वेधले. ‘झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ’ ही संकल्पना समाजमनात रुजावी यासाठी हे वृक्ष संमेलन होत आहे. आपल्याला फक्त लागवड करून झाडे जगवायची आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड करण्याचे आवाहन सयाजी शिंदे यांनी दिंडीच्या समारोपप्रसंगी केले. वृक्ष संमेलनात ‘वृक्ष सुंदरी’ किताब देण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलींची निवड करून वृक्षलागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही सयाजी शिंदे यांनी सांगितले.