बीड : तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथील शिक्षकाची बदली गेवराई तालुक्यात झाली आहे. परंतू ही बदली रद्द करून तेच शिक्षक पुन्हा आमच्या शाळेत परत करा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठून शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. काही वेळ हे विद्यार्थी त्यांच्या दालनासमोरही बसले होते. काही वेळाने चर्चा झाल्यावर मागण्यांचे निवेदन दिले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. यशवंत सेनेचे नेते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
तांदळवाडी हवेली येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. त्या ठिकाणी दोन शिक्षकांची नियूक्ती आहे. यातील एका शिक्षकाची बदली गेवराई तालुक्यात झाली असून त्या जागी माजलगाव तालुक्यातील शिक्षकाची नियूक्ती झाली आहे. परंतू जुनाच शिक्षक पुन्हा परत देण्यात यावा, या मागणीसाठी या गावातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. जिल्हा परिषद गाठून शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला. शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी सर्व प्रक्रिया समजावून सांगितल्यावर आंदोलकांचे समाधान झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन फुलारी यांना दिले.
दरम्यान, फुलारी यांनी प्रतिनियूक्तीचा हा अधिकार विभागीय आयुक्तांना आहे. यासंदर्भात प्रस्ताव पाठवला जाईल, असे अश्वासन दिल्याची माहिती भारत सोन्नर यांनीदिली. यावेळी गावचे सरपंच कैलास निर्मळ, उपसरपंच रामनाथ यमगर, राजाराम निर्मळ, नारायण निर्मळ, राम खांडेकर, विष्णू तुपे, संपत शेंडगे, विकास आंगरखे, नारायण खांडेकर, अंकुश निर्मळ, परमेश्वर पारेकर, भारत आंगरखे, शिवाजी कोळेकर, राधेश्याम पवळ, सुनील पवार, भारत कोळेकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.