बीड : ये ये थांब.. कुठे चाललास.. ओळखपत्र आहे का?... नाही साहेब... मी पॉझिटिव्ह आहे. आताच मेसेज आलाय. हे पहा... मी रुग्णालयात ॲडमिट व्हायला चाललोय.. असे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी अडविलेल्या एका नागरिकाने दिले. जिल्हाधिकारी, सीईओ, एसपी, तहसीलदार यांनी रस्त्यावर उतरून चौकशी केल्यानंतर अनेकांची विचारपूस करण्यात आली. तसेच नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याला ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. परंतु लोक याचे पालन करत नसल्याचे वारंवार दिसत आहे. काही लोक दुकाने उघडे ठेवतात. याबाबत तक्रारी प्राप्त होताच गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर.राजा, तहसीलदार शिरीष वमने हे अधिकारी रस्त्यावर उतरले. नागरिकांना आवाहन करण्यासह रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची चौकशी केली. यात काही लोक रुग्णालयांसाठीच बाहेर पडल्याचे दिसले. जे विनाकारण बाहेर फिरले त्यांना दंड आकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत हे चारही अधिकारी शहरातील मुख्य रस्त्यावर फिरून लॉकडाऊनचा आढावा घेत होते.
वाहन बाजारच्या दुकानाला सील
जालना रोडवरील एका खासगी वाहन बाजाराचे दुकान उघडे दिसले. यात या ताफ्याने छापा मारला. यात पाच ते सहा कामगारांसह मालक दिसले. त्यांची ॲन्टिजन तपासणी करण्यात आली. तसेच हे दुकान सील करण्यात आले.
ताफा पाहण्यासाठी घरातील लोक रस्त्यावर
सुभाष रोडवरून हा ताफा माळीवेस मार्गे सावतामाळी चौकाकडे गेला. अचानक पोलिसांचा ताफा पाहिल्यानंतर घरातील लोक बाहेर आले. ताफा निघून गेल्यानंतरही तरुणांसह इतर लोक रस्त्यावर गर्दी करून होते.
प्रत्येकजण संकटातच बाहेर
या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी अनेकांना अडवून विचारणा केली. यात दवाखाना, जेवण आदी कारणांमुळेच ते घराबाहेर पडल्याचे दिसत होते. प्रत्येकजण संकटात होता. तसेच अडविलेल्यांपैकी काही लोक आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर होते.
===Photopath===
060521\06_2_bed_17_06052021_14.jpeg~060521\06_2_bed_16_06052021_14.jpeg
===Caption===
अधिकाऱ्यांचा ताफा पुढे गेल्यानंतर तो पाहण्यासाठी घरात बसलेले लोक रस्तयावर आले. यावेळी गर्दी जमली होती. ~बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर उतरून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर.राजा, तहसीलदार शिरीष वमने यांनी नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले.