बीड : येथील स्काऊट गाईड भवनसमोर भररस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेने मंगळवारी एकच खळबळ उडाली होती. नशेच्या गोळ्या विक्रीतून हत्येचा थरार घडला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका अल्पवयीन मुलाने (विधिसंघर्षग्रस्त बालक) हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर त्याने पोलीस ठाणे गाठून ‘साहब, मैं मर्डर करके आया हूँ’, असे सांगून हत्येची कबुली दिली.
शेख शाहेद शेख सत्तार (२४, रा. धांडेगल्ली, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता त्याच्या पोटात धारदार चाकू खुपसून त्याला संपविण्यात आले. शेख साजेद शेख सत्तार यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह (विधिसंघर्षग्रस्त बालक), मोहनसिंग हिरासिंग शिकलकरी (२०) व राधाबाई हिरासिंग शिकलकरी (५०, दोघे रा. बसस्थानकामागे, बीड) यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला.
मयत व आरोपी यांच्यात नशेच्या गोळ्यांच्या विक्रीवरून वाद झाला होता. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ त्यांच्यात बाचाबाची झाली होती, त्यानंतर शेख शाहेद हा धावत बसस्थानकाच्या दिशेने पळाला. स्काऊट गाईड भवनसमोरील एका पानटपरीजवळ त्यास अल्पवयीन मुलगा व मोहनसिंगने गाठले. मोहनसिंगने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला असता शेख शाहेद याने तो चुकविला. तेव्हा अल्पवयीन मुलाने मोहनसिंगकडील चाकू हिसकावून शेख शाहेदच्या पोटात वार केला. त्यानंतर त्या दोघांनी तेथून पोबारा केला. अल्पवयीन युवकाने शिवाजीनगर ठाणे गाठून हत्येची कबुली दिली, तर मोहनसिंग शिकलकरी यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून ताब्यात घेण्यात आले व राधाबाई शिकलकरी हिला बसस्थानकामागून अटक केली.
पाच दिवसांची पोलीस कोठडीराधाबाई व मोहनसिंग शिकलकरी या माय-लेकांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अल्पवयीन बालकास बालन्यायमंडळासमोर उभे केले असता त्यास बालगृहात ठेवण्याचे आदेश देण्यात आले, अशी माहिती उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांनी दिली.