लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : साहेब, दोन दिवस झाले आरटीपीसीआर चाचणी केली होती. परंतु, त्याचा अहवाल आणखी मिळालाच नाही हो. मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह, याची माहिती हवी होती. मला कोणाचा कॉल पण आला नाही आणि मला कोणी माहिती पण देत नाही. मला कोण सांगेल ही माहिती. विनंती आहे, मला माझा अहवाल सांगताल का? अशी विचारणा करणारे रोज शेकडो कॉल आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षात येत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश करण्यापूर्वीच जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा प्रशिक्षण केंद्रात नियंत्रण कक्ष तयार केलेला आहे. सुरुवातीला येथून कोरोनाचे अहवाल पब्लिश केले जात होते. आजही येथूनच सर्व अहवाल वरिष्ठांना पाठविले जातात. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ग्राउंड लेव्हलला वरिष्ठांचे मेसेज पास करण्याचे कामही येथूनच होते. सध्या येथे जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांतील खाटांची माहितीही अपलोड केली जात आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. कोरोनाकाळात हा नियंत्रण कक्ष सामान्यांसाठी लाभदायक ठरला आहे. आजही येथून सामान्यांना माहिती दिली जात आहे.
दरम्यान, कोरोनाकाळात येथे कर्तव्य बजावणारे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र नियंत्रण कक्षात काम करत होते. येथेच जेवण आणि आरामही करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.
रेमडेसिविर इंजेक्शन काेठे भेटेल हो?
सध्या जिल्ह्यात सर्वत्रच रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. एका इंजेक्शनसाठी नातेवाईकांना दिवसरात्र जागरण करावे लागत आहे, तरीही ते मिळत नसल्याचे दिसते.
जिल्हा शल्यचिकित्सक, औषध निरीक्षक यांना संपर्क करूनही इंजेक्शन मिळत नाही. इकडे बाधित रुग्णही इंजेक्शन मिळत नसल्याने तणावात असून, नातेवाईकांचेही हाल होत आहेत.
याच इंजेक्शनची माहिती घेण्यासाठी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनाही कॉल येत आहेत. परंतु, येथे त्याची माहितीच नसल्याने सामान्यांचे समाधान होत नसल्याचे दिसते.
नियंत्रण कक्षात १८ लोक
साहेब, मी चाचणी केली होती, पण मला मेसेजच आला नाही. माझा स्वॅब घेतला नसेल का? बर, घेतला तर त्याचा अहवाल कधीपर्यंत येईल. अहवाल आल्यावर आम्हाला कॉल करताल की आम्ही करावा, असे अनेक प्रश्न एका ३० वर्षीय युवकाने नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याला विचारले होते.
माझ्या भावाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मग त्याला रेमडेसिविरची गरज आहे का, असेल तर हे इंजेक्शन कोठे मिळते. अहवाल निगेटिव्ह असला तरी त्याला कोविड सेंटरमध्ये का ठेवले, आता त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत, मग आता आम्हीसुद्धा चाचणी करून घ्यावी का, असेही प्रश्न विचारतात.
तक्रारी कायम
जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आहे. डॉक्टर वेळेवर राऊंड घेत नाहीत. परिचारिका लक्ष देत नाहीत. औषधे वेळेवर दिली जात नाहीत. फॅन बंद आहेत. शौचालये ब्लॉक झालीत, अशा तक्रारीही नियंत्रण कक्षात येतात. तसेच काही अधिकाऱ्यांनाही याबाबत कोरोनाबाधित रुग्ण थेट कोरोना वॉर्डामधून संपर्क करतात. परंतु त्यांना यावर केवळ आश्वासने मिळतात. आजही या तक्रारी कायम असल्याचे दिसत आहे.
मागील वर्षभरापासून प्रशिक्षण केंद्रात नियंत्रण कक्ष कार्यान्वित केलेला आहे. येथून कोरोना अहवालांसह काॅन्टॅक्ट ट्रेसिंग केली जाते. तसेच अडचणीतील लोकांना माहितीही दिली जाते. जवळपास १५ लोक येथे नियमित काम करत असतात.
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
===Photopath===
210421\21_2_bed_8_21042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील नियंत्रण कक्षातून कोरोनाचा आढावा घेण्यासह इतर कामकाज करताना कक्षाती अधिकारी, कर्मचारी दिसत आहेत.