बीड : आरोग्य सेवा देण्यात बीड जिल्हा रूग्णालय तत्पर असले तरी काही परिचारीकांमुळे प्रतीमा मलीन होत चालली आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांना काही परिचारीका उद्धट बोलतात. शिवाय रूग्णाची चौकशी केल्यावर व्यवस्थित माहिती न देता टोलवाटोलवी करीत असल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही परिचारीका मात्र, प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असल्याने आरोग्य सेवा दर्जेदार मिळत आहे.
कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, मोतीबिंंदु शस्त्रक्रिया करण्यात जिल्हा आरोग्य सेवा अव्वल आहे. त्यातच आता कायाकल्पमध्येही बीड जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्रांनी यश संपादन केले आहे. जिल्हा रूग्णालयाचाही क्रमांक थोड्या गुणाने चुकला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टिम यशस्वी काम करीत आहे.
असे असले तरी जिल्हा रूग्णालयात काही काही परिचारीका व डॉक्टर रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सन्मानजनक वागणूक देत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच अडचण विचारण्यास गेल्यावर त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. या मोजक्या उद्धट वर्तणूक देणाऱ्या परिचारीकांमुळे सर्वच परिचारीकांबद्दल संताप व्यक्त होत आहे. रूग्ण व नातेवाईकांना समाधानकारक माहिती देण्याबरोबरच त्यांना सन्माद द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ताण आहे, मात्र राग नको...रूग्ण संख्या लक्षात घेता परिचारीकांवर कामाचा ताण आहे, हे लक्षात येते. मात्र याचा ताण सर्वसामान्यांवर का काढावा? असा सवाल आहे. त्यांना सन्मान दिला जात नसल्याने वाद होत असल्याचे दिसून येत आहे. या मोजक्या परिचारीकांमुळे प्रामाणिक सेवा देणाऱ्या इतर परिचारीकाही बदनाम होत आहे.
गुन्हेगाराप्रमाणे देतात वागणूकवॉर्ड क्रमांक ७ मध्ये एका रूग्णाबद्दल नातेवाईक चौकशीला गेले होते. यावेळी येथील परिचारीकेने माहिती न देता डॉक्टरांना विचारा, असे सांगून टोलवाटोलवी केली. डॉक्टर दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते. मग डॉक्टरची वाट पहात सर्वसामान्यांनी रात्र काढायची का? असा सवालही उपस्थित होत आहे. विचारपूस करायला गेल्यावर परिचारीका (काही) नातेवाईकांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत.
मान द्या, सन्मान घ्या..उपचारासाठी आलेले रूग्ण व चौकशीसाठी आलेल्या नातेवाईकांना मान द्यावा. तरच त्यांचे समाधान होईल आणि ते सन्मान देतील. अन्यथा बोलण्यातून अनेकवेळा वाद झाल्याची उदाहरणे आहेत. प्रामाणिक सेवा देणाऱ्या परिचारीकांचे नेहमीच माध्यमांनी स्वागतही केलेले आहे.
चौकशी करून कारवाई करू रूग्णावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची चौकशी केल्यास माहिती द्यायला हरकत नाही. काही वाटल्यास तक्रार करा. चौकशी करून कारवाई करू.- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड