Beed Murder Case ( Marathi News ) : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अखेर एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात १० जणांची टीम या प्रकरणात सखोल तपास करणार आहे. एसआयटीच्या स्थापनेनंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग मिळण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटल्यानंतरही तीन आरोपी अजूनही फरार आहेत. तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कराडचा या प्रकरणात सहभाग होता का आणि असेल तर तो कशा स्वरुपात होता, हे स्पष्ट होण्यासाठी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एसआयटीची घोषणा केली होती.
कोण आहे बसवराज तेली?
सन २०१० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. तेली हे एमबीबीएस असून ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावातील आहेत. पोलीस दलातील त्यांच्या सेवेस पाचोरा (जि. जळगाव) येथून झाली. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून, पुणे येथे शहर उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
एसआयटीच्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली - पोलीस उपमहानिरीक्षकअनिल गुजर - पो. उप अधीक्षकविजयसिंग शिवलाल जोनवाल- स.पो. निरीक्षकमहेश विघ्ने - पो.उ.निरीक्षकआनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षकतुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षकमनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार/१३चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक /१८२६बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक/१६७३संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई/४७१