मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बुधवारी राज्य सरकारने विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात याबाबतचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या टीममध्ये बीड सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे व पोलिस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. या घटनेला २४ दिवस झाले तरी मुख्य आरोपीसह ३ आरोपींना अटक करण्यात पोलिस, सीआयडी आणि प्रशासनाला यश आलेले नाही. आता एसआयटी नियुक्त केल्याने तपासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मस्साजोग ग्रामस्थांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन -तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणातील उर्वरित आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिस, सीआयडी व प्रशासनाला अपयश आले. याच्या निषेधार्थ देशमुख कुटुंबीय व गावकऱ्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी सकाळी साडेदहा वाजेपासून मस्साजोग येथील तलावातील पाण्यात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. उर्वरित आरोपी पकडण्यासाठी पोलिसांनी आठ दिवसांचा अवधी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सीआयडीकडून वाल्मीक कराडची कसून चौकशीसीआयडीच्या अधिकाऱ्यांनी खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याची कसून चौकशी सुरू केली आहे. एका बंदिस्त रूममध्ये त्याची गुन्ह्याच्या संदर्भाने चौकशी केली जात आहे, अशी माहिती सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पुण्यात सीआयडीच्या कार्यालयात शरण आल्यावर मंगळवारी रात्री कराड याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
त्याला बीड शहर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले असून सीआयडी अधिकारी त्याला चौकशीसाठी दोन तास लॉकअपच्या बाहेर काढत आहेत.
बीड शहर ठाण्यात येणाऱ्यांची नोंदबीड शहर पोलिस ठाण्यात कराड याला लाॅकअपमध्ये ठेवले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव व काय काम आहे, हे विचारले जात आहे. हा डेटा दररोज संध्याकाळी सीआयडी व पाेलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहे.
तीन जणांची चौकशीफरार आरोपी सुदर्शन घुले याचा शोध सीआयडीचे अधिकारी घेत आहेत. घुले याच्या अनुषंगाने त्याच्या नातेवाइकांपैकी तीन जणांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली आहे.