बीड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी मध्यरात्री केज तालुक्यातील युसूफवडगाव पोलीस ठाणे हद्दीत एका घरावर धाड टाकून ६ लाख ४२ हजार १२० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून, सर्व दारू दुकाने बंद आहेत. अशावेळी मद्याची अवैधरीत्या विक्री होऊ नये, याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २६ मे रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजेदरम्यान उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील एका घरात छापा टाकला. याठिकाणी देशी दारूच्या १९७ पेट्या व बीअरच्या ३ पेट्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपी इसम गणेश बाबासाहेब रांजणकरविरुद्ध (रा. युसूफवडगाव, ता. केज) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
आरोपीच्या राहत्या घरातून देशी दारू ९० मिली क्षमतेचे १९७ बॉक्स व बीअरचे ३ बॉक्स, असा दारूचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत ५ लाख ९७ हजार १२० रुपये इतकी आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासात केज तालुक्यातील सुकळी येथील आरोपीच्या शेतातील धाब्यावरून देशी दारू ९० मिली क्षमतेचे ४५ हजार किमतीचे एकूण १५ बॉक्स आणखी जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, विभागीय उपायुक्त औरंगाबाद प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कडवे, दुय्यम निरीक्षक राठोड, जवान मोरे, सांगुडे, अमीन सय्यद, सादेक अहमद व जवान-नि-वाहन चालक जारवाल यांनी ही कारवाई केली.
----
लातूरहून खरेदी
चौकशीदरम्यान आरोपीने ही दारू लातूर येथून उस्मानाबाद येथील देशी दारू दुकानाच्या नावाने खरेदी केल्याची माहिती पुढे आली. लॉकडाऊन कालावधीत चढ्या दराने दारूची विक्री करून नफा कमावण्याच्या उद्देशाने हा साठा केला होता.
---
लॉकडाऊन कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू, हातभट्टीची दारू व परराज्यातील दारूवर सातत्याने कारवाया करण्यात येत असून, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व दारू दुकाने बंद राहतील, याची दक्षता घेण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे.
===Photopath===
260521\26_2_bed_21_26052021_14.jpeg
===Caption===
युसुफवडगाव येथे साडेसहा लाखाची देशी दारू जप्त