जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून सहा तासांचा शिथिल वेळ दिल्याने सकाळपासूनच बाजारातील सर्व दुकाने, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले. काही ठिकाणी लोक अनावश्यक गर्दी करीत असल्याचे दिसून आले. प्रशासनाने सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा दिसून आला.
सवलत देऊनही दुकाने उघडी
दुपारी एक वाजेपर्यंतची वेळ असल्याने पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून दुकाने बंद करण्याची सूचना केली. सहा तासांची ढील देऊनही काही दुकाने सुरू होती. पोलिसांनी समज देऊन आणि प्रशासनाने सवलत देऊनही नियमांचे पालन न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाला रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.