बीड : लाडक्या गणरायाचे १० सप्टेंबर रोजी सर्वत्र जल्लोषात आगमन झाले. विघ्नहर्त्याचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. गणेशोत्सवात भांडणतंटे करणारे, जुगार खेळणारे व मद्यप्राशन करणारे उपद्रवी पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत. जिल्ह्यात सहाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवायांचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.
गणेशाेत्सवात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश अधीक्षकांनी ठाणेप्रमुखांना दिले आहेत. यंदादेखील कोरोनाच्या सावटाखाली उत्सव साजरा होत आहे. मात्र, या दरम्यान कोठेही गडबड, गोंधळ होणार नाही तसेच जुने वाद उफाळून येणार नाहीत, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गणेशोत्सवात भांडणाची पार्श्वभूमी असलेल्यांवर पोलिसांचा हमखास ‘वॉच’ राहणार आहे. यासोबत गणेश मूर्तीसमोर जुगार खेळणाऱ्यांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्ह्यात सहाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. याशिवाय काही जणांना हद्दपार देखील करण्यात येणार असून काही जणांना तात्पुरत्या कालावधीसाठीही तडीपार करण्याचे निर्देश दिले असल्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी सांगितले.
....
बीड उपविभाग अव्वल
दरम्यान, चालू वर्षी आतापर्यंत २२ जणांवर हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व कारवाया बीड उपविभागात झाल्या आहेत. बीडचे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी सर्व प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचे आदेश जारी केले. मात्र, जिल्ह्यातील इतर पाच उपविभागांतून अद्याप एकालाही हद्दपार करण्यात आलेेले नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीडप्रमाणेच इतर उपविभागांतून देखील कारवाया अपेक्षित आहेत.
....
गणेशोत्सवात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहाशे उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाईचे नियोजन केले आहे. गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाया सुरू आहेत. दोघांना नुकतेच स्थानबद्ध केले. काही जणांच्या तडीपारीचे आदेश निघालेले असून काही प्रस्तावित आहेत.
- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड
....
100921\10bed_18_10092021_14.jpg
आर.राजा