अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : वडिलांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आकाशवर पडली. लॉकडाऊनमुळे काम मिळेना. त्यातच आई आजारी असल्याने तिच्या उपचाराचा खर्च, घरात चार माणसांचा उदरनिर्वाहही होईना. याचे नैराश्य आल्याने आकाश अशोक सावंत या २१ वर्षीय युवकाने दोन दिवसांपूर्वी म्हणजे १७ मे रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
आकाशच्या आत्महत्येमुळे कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने सावंत कुटुंब उघड्यावर पडले आहे.
ही दुर्देवी व्यथा सावंत कुटुंबियांच्या नशिबी आली. सगळं काही सुरळीत सुरू होते; मात्र दोन महिन्यांपूर्वी अंबाजोगाई येथील कबीरनगर परिसरात राहणारे वाहनचालक अशोक सावंत यांचे दोन महिन्यांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, मुलगा आकाश व दोन मुली असा परिवार होता. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आकाशच्या खांद्यावर आली. तो बांधकामावर सेंट्रिंगचे काम करत होता; तर त्याची आई सुनीता या मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवू लागल्या.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. या लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे बांधकामेही ठप्प झाली. परिणामी आकाशवर बेरोजगारीची वेळ आली. दुसरेही काम मिळेना. आईही आजारी पडल्याने तिचाही कुटुंबाला लागणारा हातभार बंद झाला. त्यातच आईच्या उपचाराचा खर्च. लोकांकडून शे-पाचशे घेऊन खर्च भागवू लागला. मात्र, काम बंद असल्याने ते परत करायचे कसे? त्यातच उदरनिर्वाहाचा दैनंदिन खर्च भेडसावू लागला. चारजणांचे कुटुंब घरात बसून कसे चालवायचे? याची मोठी चिंता आकाशला भेडसावू लागली. यातून त्याच्या मनात मोठे नैराश्य निर्माण झाले. आपण आपल्या कुटुंबाचा सांभाळही नीट करू शकत नाही, या निराशेच्या भावनेने त्याला ग्रासले व यातूनच त्याने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा बेरोजगारी व उपासमारीचा बळी ठरला.
आकाशच्या जाण्याने आज त्याच्या कुटुंबासमोर मोठी भीषण समस्या निर्माण झाली आहे. घरातील दोन्ही पुरुष एका मागे एक निघून गेले. कर्ता व्यक्तीच कुटुंबात राहिला नाही. माय व दोन लेकी एवढेच कुटुंब पाठीमागे राहिले. एकमेव राहिलेला कुटुंबाचा आधारही निघून गेला. आता या कुटुंबाची मोठी परवड झाली आहे.
सावंत कुटुंबाला २५ लाखांची मदत करा.
सावंत कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष एकापाठोपाठ निघून गेले. आज या कुटुंबाची मोठी दुर्दशा झाली आहे. अशा स्थितीत त्यांच्या उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्यासाठी शासनाने सावंत कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान पोटभरे यांनी केली आहे.
===Photopath===
190521\avinash mudegaonkar_img-20210518-wa0076_14.jpg