जिल्हा रुग्णालयात तीन कंत्राटी आणि तीन नियमित असे सहा फिजिशियन कार्यरत आहेत. तिघांना कोरोना वॉर्डात तर तिघांना नॉन कोविड वॉर्डात ड्यूटी लावली जाते; परंतु त्यातील एकही डॉक्टर सुट्टीवर गेले तर चक्क डॉ. आशिष कोठारी या एमबीबीएस डॉक्टरला फिजिशयन म्हणून कॉल अटेंड करायला सांगितले जात आहे, तसेच डॉ. शंकर काशिद या बालरोग तज्ज्ञाला मागील अनेक महिन्यांपासून फिजिशियन म्हणून ड्युटी लावली जात आहे. सर्वांनाच उपचार करण्याइतपत शिक्षण असले तरी त्यातील ते तज्ज्ञ आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. फिजिशियनची उपलब्धता करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नियमित व कंत्राटी फिजिशियनचा खासगीत रस
जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या नियमित व कंत्राटी फिजिशियन यांचे स्वत:चे खासगी दवाखाने आहेत. सरकारीपेक्षा त्यांना खासगीतच जास्त रस असतो. ओपीडीला दांडी मारून खासगीत रुग्ण तपासल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. हे सर्व माहीत असतानाही अधिकारी मूग गिळून गप्प का बसतात? असा सवाल उपस्थित होत आहे.
---
रोटेशन लावण्याची गरज
बालरोग विभागात जवळपास चार डॉक्टर आहेत; परंतु यातील केवळ डॉ. काशीद यांनाच वारंवार ड्युटी लावली जात आहे. याच विभागातील डॉक्टर अथवा इतर विभागातील डॉक्टरांना ड्युटी लावली जात नसल्याचे सांगण्यात आले. ड्युटीसाठीही 'वशिला' लावला जात असून, वेळ मारून नेण्याचे काम काही डॉक्टर करत असल्याचे सूत्रांकडून समजते. यात ड्युटी लावणारे अधिकारी हेदेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
---
आपल्याकडे सहा फिजिशियन आहेत. पैकी एकही सुट्टीवर गेले तर इतर डॉक्टरांची मदत घेतली जाते. आता रोटेशननुसार सर्वांच्याच ड्युटी लावल्या जातील.
डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड.