शिरूर कासार : तालुक्यात फळबागा आता चांगल्या प्रकारे जोपासल्या जात आहेत. त्यात नानाविध प्रकारच्या फळबागा लावल्या जातात. त्यातून दोन पैशांची प्राप्ती केली जाते. अशाच एका वृक्षप्रेमीने लावलेल्या केशर आंब्याची झाडे आता फळांनी लगडली आहे. केशर आंब्यांच्या गंध शिरूरच्या मातीला लागला असून, हे आंबे आपण पैसा मिळविण्यासाठी लावले नसून ते निव्वळ वाणवळा म्हणून सगेसोयरे, ईष्ट मित्र ,स्नेहीजनांना वाटप करणार असल्याचे फळबाग मालक रामनाथ कांबळे यांनी सांगितले.
तालुक्यातील विघनवाडी शिवारात दहा वर्षांपूर्वी रामनाथ कांबळे यांनी गॅस गोदामासाठी रोडलगत जागा घेतली. गोदाम बांधकामाबरोबरच संरक्षण भिंतीच्या चोहोबाजूने पन्नास झाडे केशर आंब्याची लागवड केली. पाहता-पाहता गोदामाचे काम पूर्णत्वाला गेले. कामाबरोबरच या झाडांना वेळेवर पाणी मिळत गेल्याने व पोषक जागा मिळाल्याने रोपांची झाडे कधी झाली, कळलीही नाही. चोहोबाजूनी हिरवीगार आमराई मोहीत करत आहे.
आंब्याला लागेल तशी खतांची मात्रा कांबळे यांनी दिली. पाच वर्षांपासून केशर आंब्याचा सुगंध परिसरात दरवळत आहे. चवीने गोड असल्याने कैरीच्या अवस्थेपासून हे सर्वांना भुरळ घालत आहे. या वर्षी तर सर्वच झाडे मोठ्या फळांनी खालपासून वरपर्यंत बहरली आहेत. त्याच्या सुगंधाने अंबीया डहाळी फळे चुंबी रसाळी या संतोक्तीप्रमाणे पोपट आदी पक्षीही फळांचा आस्वाद घेत आहेत. पक्ष्यांमुळे या आम्रवृक्षाला आणखी वैभव प्राप्त झाले आहे. सुगंध आणि गोड, चमकदार अशा तिन्ही गुणांचा संयोग आंब्यात जुळून आल्याचे विलोभनीय दृश्य साहजिकच लक्षवेधी ठरत आहे.
कैरी अवस्थेपासून याची चव सर्व जण चाखत आहेत. आता आपण ही केशर आंबे पैसे मिळविण्यासाठी विक्री करणार नसून पाडाला लागल्यानंतर वाणवळा म्हणून आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे व मित्रपरिवाराला देणार असल्याचे रामनाथ कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्येकाने आपल्या घराजवळ, शेतात बांधावर का होईना, फळवृक्षाची लागवड केल्यास, त्याचा फळ आणि ऑक्सिजन असा दुहेरी फायदा आपणास तर होईलच. त्याचबरोबर, पक्ष्यांनाही त्याचा उपयोग होईल व निसर्गाचे दुहेरी संतुलन राखण्यास हातभार लागेल, असे कांबळे म्हणाले.
===Photopath===
080521\img20210502131441_14.jpg