अंबाजोगाई : तंबाखू, गुटखा व सिगारेटवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणले असता या सर्व वस्तूंचे भाव तिप्पट, चौप्पट वाढले. बंदीत शौकिनांची मोठी लूट सुरू असून, छुप्या मार्गाने धूम्रपान वस्तूंची विक्री बिनधास्तपणे सुरूच आहे.
ज्या गोष्टीवर बंदी येते, त्या वस्तूंचे भाव तिप्पट, चौपट होतात. ही बाब नवीन राहिली नाही.
धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांमुळे सार्वजनिक ठिकाणी होणारे थुंकण्याचे प्रकार बंद व्हावेत. यातून संसर्ग टाळला जावा, या उद्देशाने शासनाने परिपत्रक काढून धूम्रपानावर बंदी घातली. मात्र, याचा गैरफायदा समाजातील अनेकजण बिनधास्तपणे उठवून दुप्पट भावाने विक्री सुरू झाली आहे. बंदीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत नगर परिषद प्रशासनाने कॅरिबॅग व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून दंड केला. त्यानंतर बहुतांश व्यापाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची टपरी बंद केली. मात्र अनेकांनी याचा गैरफायदा उठवणे सुरूच केले. छुप्या पद्धतीने गल्लीबोळात विक्री सुरू ठेवली आहे. १० रुपयांना मिळणारी तंबाखू पुडी ३० रुपयांना तर ५ रुपयांना मिळणारी तंबाखू पुडी २० रुपयांना मिळत आहे. गुटख्याची व सिगारेटचीही तिप्पट-चौपट भावाने विक्री सुरू केली आहे. तरीही शौकीन तिप्पट-चौपट भावाने खरेदी करत आपली तलफ भागवत आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने कारवाई करून ही अवैध विक्री रोखावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.