मुंबई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतऱ्यांनाना दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत. फडणवीसांच्या या दौऱ्यात माजी ग्रामविकामंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज सहभागी होणार नाहीत. मात्र, नांदेड जिल्ह्याचा दौरा संपवून त्या सहभागी होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे आज बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसऱ्यादिवशी २० रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसऱ्या दिवशी २१ रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत. सध्या मुख्यमंत्र्यांपासून सर्वच नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत.
बीड जिल्ह्यातील भाजपा नेत्या पंकजा मुंडें यांनी अगोदरच आपला नियोजित दौरा ठरवला होता, त्यामुळे आपल्या नियोजित दौऱ्याप्रमाणे, नांदेड-हिंगोली-परभणी-बीड असा अतिवृष्टी पाहणी दौरा करणार आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचाही मराठवाड्यात दौरा असल्याने 20 तारखेला नांदेड जिल्ह्याचा दौरा संपवून पंकजा मुंडे त्यांच्या दौऱ्यात सहभागी होतील, असे पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले आहे.
पंकजा मुंडे तीन दिवसांच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना पंकजा यांनी केल्या आहेत. या दौऱ्यात सोशल डिस्टन्स आणि मास्क बंधनकारक असणार आहे. काही लक्षणे असल्यास दौऱ्यात सहभागी होऊ नका. तुमची काळजी आहे, म्हणून मी हे नियम ठरवल्याचं पंकजा यांनी सांगितलंय.