परळी: महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने मुहूर्तमेढ रोवलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खेडोपाडीच नव्हे तर शहरात देखील जोपासली जाते. येथे सर्व लहान-थोर एकत्र येऊन हरिनाम गातात व एकत्रित काल्याचा प्रसाद ग्रहण करतात. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील आज एका अखंड हरिनाम सप्ताहाच्या समाप्ती सोहळ्यात गाव पारावार बसून गावकऱ्यांसोबत पंगतीत बसुन जेवताना दिसून आले.
झाले असे की, धनंजय मुंडे यांच्या मूळ जन्मगाव नाथ्रा (ता. परळी) येथे पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचा कीर्तनाने शेवट झाला. यावेळी बालयोगी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या अमृतवाणीतून भाविकांनी काल्याचा आंनद घेतला. यावेळी आपल्या परंपरा जोपासणारे म्हणून ओळख असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी गावातील सप्ताहात हजेरी लावत हरिहर महाराजांचे दर्शन घेतले. एवढेच नव्हे तर गावकऱ्यांसोबत गाव पारावार (गावातील मंदिर) पंगतीला बसून धनंजय मुंडे यांनी प्रसाद घेत जेवणही केले.
मी कितीही मोठा झालोतरी, इथल्या माणसांमध्ये सदैव वावरता यावे व कायम जमिनीवरच पाय राहावेत, अशी प्रार्थना धनंजय मुंडे हे नेहमी आपल्या भाषणांतून करत असतात, त्याची आज प्रचितीच जणू आली. यावेळी मा. आ. केशवराव आंधळे, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, पंचायत समिती सभापती पिंटू मुंडे, सरपंच सचिन मुंडे, सेवा सोसायटीचे चेअरमन अतुल मुंडे यांसह गावातील ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती.