- नितीन कांबळे
कडा - गावातच वीज निर्मिती करून तिथेच त्याचा वापर करण्याची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आष्टी तालुक्यातील कडा येथे कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे कृषी पंपाना दिवसा विद्यूत पुरवठा करणे शक्य होणार आहे.
शेतीसाठी वीज पुरवठा करणे हे महावितरण कंपनीसाठी मोठे आव्हानाचे काम असते . कारण वीज उत्पादन ठराविक प्रमाणात होत असले तरी त्याचा वापर मात्र समसमान नसतो. अनेकदा विजेची मागणी एवढी वाढते की विद्युत यंत्रणेवर मोठा ताण येतो. त्यासाठी भारनियमन सारखा पर्याय निवडावा लागतो. यातून बऱ्याचदा शेतीला रात्री वीज पुरवठा करावा लागतो . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी असते. मात्र, आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कडा परिसरातील गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कडा येथील महावितरण उपकेंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याद्वारे वीज निर्मिती केली जाते.
४१६ किलो वॉट क्षमतेच्या या सौर वीज निर्मिती प्रकल्पात दिवसभरात स्वच्छ सूर्यप्रकाश असताना साधारण १७०० युनिट थ्रीफेज वीज तयार होते त्यावर कृषी पंप चालू शकतात असे स्थानिक कनिष्ठ अभियंता डी डी दसपुते , सुरेश थोरात यांनी सांगितले. तर धानोरा येथे ही लवकरच असा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती आष्टीचे उप अभियंता प्रवीण पवार यांनी दिली. ही यंत्रणा सुरु झाल्यापासून दिवसा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीला पाणी देणे सोपे झाल्याचे मेहेकरी येथील शेतकरी बाळासाहेब जगताप यांनी सांगितले.