- नितीन कांबळेकडा (बीड): आधीच जागोजागी खड्डे पडलेले असताना बीड-कडा राष्ट्रीय महामार्गा दरम्यान एकाने चक्क अनधिकृतपणे खोदकाम केल्याने प्रवास्यांच्या मरणयातनात आणखी भर पडली आहे. गळती शोधण्यासाठी आज सकाळी थेट खोदकाम सुरु केल्याने महामार्गावर बराच वेळ वाहतूक खोळंबा झाला होता.
बीड -कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर साबलखेड चिचपूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. अनेक वर्षांपासून महामार्गाची दयनीय अवस्था असताना आज सकाळी यावर अनधिकृतपणे खोदकाम करण्यात आले. महामार्ग एका बाजूने जलवाहिनीतील गळती शोधण्यासाठी खोदल्याचे पुढे आले आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून यासाठी कसलीच परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. अनधिकृतपणे रस्ता खोदल्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे खोदकाम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी केली आहे.
वाहन धारकांची वाढली डोकेदुखी सांगळे हाॅस्पीटल ते गांधी हाॅस्पीटल दरम्यान रस्ता खोदला असल्याने वाहन धारकांना मोठी डोकेदूखी वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या रांगा लागत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता आर.व्ही. भोपळे यांनी खोदकामासाठी परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.