बीड : पीकविमा आणि इतर शेतकी अनुदानाचे खात्यावर जमा झालेली दहा हजारांची रक्कम देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला. दोन महिन्यापूर्वी धारूर तालुक्यात घडलेल्या या घटनेत बुधवारी मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आश्रुबा कारभारी मुंडे (वय ७४, रा. अशोक नगर, धारूर) असे मयत पित्याचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी डोक्याला मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरात पायऱ्या चढत असताना पाय घसरून पडून डोक्याला चॅनल गेट लागल्याने वडील जखमी झाल्याचे आश्रुबा यांचा मुलगा बलभीम याने त्यावेळी पोलिसांना सांगितले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी आश्रुबा यांचा मृत्यू झाला. परंतु, मृतदेहावरील खुणा पाहून हा काहीतरी वेगळाच प्रकार असावा, असा संशय पोलिसांना आला. त्यादृष्टीने त्यांनी तपास केला असता आश्रुबा आणि बलभीम यांच्यात अनुदानाच्या रकमेवरून जोरदार वाद सुरु होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता बलभीम यानेच वडिलांचा खून केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याप्रकरणी सहा. फौजदार राजाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बलभीमवर धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी बलभीमला बेड्या ठोकल्या असून गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे हे करत आहेत.
तत्कालील पोनि जाधव यांचे योगदान सुरुवातीस अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्याचा तपास सहा.फौजदार राजाराम जाधव यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे आणि धारुरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या सहकार्याने तपास करून खुनाचा छडा लावला. अपघातात मृत झालेले पोलीस निरीक्षक अनिलकुमार जाधव यांनी वेळोवेळी तपासात मोलाचे मार्गदर्शन केल्याचे राजाराम जाधव यांनी सांगितले.