- नितीन कांबळे
कडा- उंदरखेल येथील तलावात एप्रिल २०२३ मध्ये मासेमारी करणाऱ्यांना एक सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा आता उलगडा झाला असून हा खून असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक म्हणजे, पोटच्या मुलानेच दोन मित्रांच्या मदतीने बापाचा खून केल्याचे पुढे आल्याने अंभोरा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की. आष्टी तालुक्यातील उंदरखेल तलावात एप्रिल २०२३ मध्ये मासेमारी करणाऱ्यांना एक सांगाडा आढळून आला होता. तो सांगाडा धानोरा येथील लक्ष्मण सदाशिव शेंडे ( ५५ ) यांचा असल्याचे पुढे आले. दरम्यान, उत्तरीय तपासणीत शेंडे यांचा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ या कालावधीत खून झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केला असता, शेंडे यांचा मुलगा अशोक याने दोन मित्रांच्या मदतीनेच खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह उंदरखेल तलावात फेकून दिल्याचे पुढे आले. तपासामुळे तब्बल वर्षभरानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. पोलीस उपनिरीक्षक रवि गुलाब देशमाने यांच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात अशोक लक्ष्मण शेंडे (मुलगा ३८ रा.धानोरा ता.आष्टी, ह.मु.मिरी माका ता.नेवासा.जि.नगर), रामवीर यादव, किरण वाघमारे ( दोघे रा.धानोरा ता.आष्टी जि.बीड ) यांच्याविरोधात खूनासह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मुलासह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. ही कामगिरी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे,पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी केली.