शिरूर कासार (जि. बीड) : तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील आई-वडिलांना अमानुष मारहाण करून आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबासाहेब त्र्यंबक खेडकर (वय ४५) यास २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याने वडिलांनाही अत्यवस्थ होईपर्यंत मारहाण केली होती. आरोपीविरोधात शिरूर पोलिसांत खून केल्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
फिर्याद देण्यासाठी कुणीच नातेवाईक न आल्याने पोलीसच फिर्यादी झाले. सदरील आरोपीस अटक केल्यानंतर शिरूर न्यायालयात सोमवारी हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर याने आई शाहूबाई त्र्यंबक व वडील त्र्यंबक खेडकर यांना शनिवारी साडेचारच्या सुमारास काठीने अमानुष मारहाण केली होती. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने नगरला खाजगी दवाखान्यात पाठविले होते. मात्र, उपचारादरम्यान आई शाहूबाई यांचा मृत्यू झाला, तर वडील त्र्यंबक खेडकर हे अत्यवस्थ असल्याने उपचार घेत आहेत.
घटनेची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी पारगावला जाऊन त्या आरोपीस रविवारी ताब्यात घेतले. रात्री उशिरा बीट अंमलदार भागवत सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला. पुढील तपास पो.नि. सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे करीत आहेत.