केज (जि. बीड) : वडिलांच्या नावावर आलेल्या पीएफच्या १३ लाखांच्या रकमेसाठी चक्क जन्मदात्या आईला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न दोन निर्दयी मुलांनी केला. ही घटना केज तालुक्यात कानडीमाळी येथे शनिवारी रात्री घडली. सरपंचाने वेळीच मध्यस्थी केल्याने आई या हल्ल्यातून सुखरूप बचावली आहे.आई इंदुबाई कुचेकर (५०) यांच्या फिर्यादीवरुन नितीन (३०) व संतोष लालासाहेब कुचेकर (३२) यांना केज पोलिसांनी अटक केली आहे. इंदुबाई यांचे पती लालासाहेब कुचेकर हे बीड जिल्हा पोलीस दलात नोकरीस होते. २००५ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात असताना ते बेपत्ता झाले. परंतु त्यांचा शोध न लागल्यामुळे २०१३ मझ्ये त्यांना मृत घोषित केले. पीएफचे १३ लाख ८४ हजार रूपये इंदूबाई यांना आॅगस्ट २०१८ मध्ये मिळाले होते. यातील ९ लाख ८४ हजार रूपये त्यांनी दोन्ही मुलांना दिले होते. राहिलेल्या पैशांसाठी ही ती त्यांना त्रास देत होती. संतोषच्या हातात पेट्रोलची बाटली पाहून इंदुबाई रस्त्यावर आल्या. संतोष तेथे आला आणि पेट्रोल आईच्या अंगावर फेकले तर नितीनने पेटविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सरपंच अमर राऊत यांनी मध्यस्थी केल्याने इंदुबाई बचावल्या. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वडिलांच्या १४ लाखांच्या ‘पीएफ’साठी बीडमध्ये आईला जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:48 AM