नांदुरघाट : नेहमी बेपत्ता असणारे ग्रामसेवक येताच, नांदुरघाट सर्कलमधील माळेवाडी येथे येताच, गावकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. मागणीनुसार ग्रामपंचायतमध्ये कोणतेच रेकॉर्ड नव्हते व ग्रामसेवक सादर करू शकले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत शोभेची वस्तू म्हणून वापरता का, असा सवाल ग्रामस्थांनी केला. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देता-देता ग्रामसेवकाची भंबेरी उडाली.
नांदुरघाट सर्कलमधील माळेवाडी येथे ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये येतच नव्हता. फोनही कधी लागत नव्हता. नागरिकांची विविध कामे महिना-महिना खोळंबल्याने, ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी तत्काळ दखल घेऊन ग्रामसेवकाला आदेशित केले. अखेर ग्रामसेवक सज्जावर उपस्थित होताच, गावातील युवक, नागरिक मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीमध्ये जमा झाले. यावेळी विद्यमान सदस्य अशोक शिंदे यांनी प्रोसिडिंग मागितले. कोणते ठराव घेतले, मासिक बैठक कधी घेतली, कोणत्या कामाचे ठराव संमत झाले, कोणत्या कामाची मागणी केली, याचे रजिस्टर दाखविण्याची मागणी केली. यावर आज दप्तर आणले नाही. चार ते पाच दिवसांत रेकॉर्ड दाखवितो, असे म्हणत ग्रामसेवकाने वेळ मारून नेली.
ग्रामस्थांनी आणले ताळ्यावर
अशोक शिंदे व युवकांनी ग्रामसेवकाला गावावर येण्यासाठी लेखी मागितले. यावर दर मंगळवारी माळेवाडी गावातील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहून सर्वसामान्य नागरिकांची कामे केली जातील. काही अडचण असेल, तर फोनवर सांगा फोन चालू असेल, असा शब्द लेखी स्वरूपात ग्रामसेवकाने दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झले.
संगणक, प्रिंटर बाहेरगावच्या इसमाकडे
आमच्या ग्रामपंचायतचे ऑनलाइन कागदपत्रांसाठी असणारे संगणक, प्रिंटर कोठे आहे, याचा जाब ग्रामसेवकाला विचारला असता, हे साहित्य दुसऱ्या गावातील ऑपरेटरच्या घरी असल्याचे ग्रामसेवक म्हणाले. यावर युवक आक्रमक झालेल्या युवकांनी आमच्या ग्रामपंचायतचे साहित्य दुसऱ्या गावात खासगी व्यक्तीच्या घरी तुम्ही ठेवलेच कसे? असा जाब विचारला. त्यानंतर, ग्रामसेवकाने तत्काळ एकुरका येथील ऑपरेटरशी संपर्क करून बोलावून घेतले. तत्काळ साहित्य ग्रामपंचायतला आणून ठेवा व येथेच काम करा, असे सांगितले.