माजलगाव : जिल्ह्यात २०१०-२० या कालावधीत नरेगा योजनेत नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक व ४९ सरपंचांना गटविकास अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्यानंतर अनेकांनी धास्ती घेऊन अंथरूण धरले आहे.
ग्रामीण भागातील विकास कामे राबवण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना २०१० पासून सुरू आहे. मात्र या योजनेचा गैरफायदा घेऊन ती राबविल्याने त्याच्या लेखापरीक्षण अहवालात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. परंतु त्याकडे जिल्हाधिकारी जगताप यांनी दुर्लक्ष केले. याबाबत न्यायालयाने गंभीर दखल घेतली. दिरंगाईप्रकरणी जिल्हाधिकारी जगताप यांची त्वरित बदली करून प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावरून बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत नरेगा कामातील संबंधित गावातील तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांना गटविकास अधिकाऱ्यांमार्फत नोटिसा बजावल्या आहेत. माजलगाव तालुक्यातील ५५ ग्रामसेवक व ४९ सरपंच यांना लेखापरीक्षण अहवालातील गंभीर त्रुटी व इतर आक्षेपार्ह मुद्द्यांबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कार्यवाही करण्याचा इशारा या नोटिसीमध्ये दिला आहे.
-----
काही निवृत्त, काही मृत
दरम्यान, मागील दहा वर्षांच्या काळात अनेक ग्रामसेवक निवृत्त झाले; तर काही मृत झाले आहेत. ज्यांना नोटीस बजावली आहे त्यापैकी अनेकांनी आपल्यावर कार्यवाही होणार अशी धास्ती घेतल्याने त्यांना दुखणे आले आहे.
--------