- नितीन कांबळेकडा (बीड): सुर्डी गावात जानेवारीमध्ये एका जुन्या वाड्याचे खोदकाम करताना भिंतीच्या देवळीत घागरभर गुप्तधनातील सुवर्ण नाणी सापडली. याचा गावभर बोभाटा होऊन सोशल मीडियावर नाण्यांचा खणखणाट व्हायरल होत आहे. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन पाहणी केली. पण पुरातत्व आणि महसूल विभागाची अद्याप काहीच हालचाल नाही. त्यांच्यापर्यंत अद्याप नाण्यांच्या खणखणाटाचा आवाजच गेला नाही की त्यांना अंधारात ठेवले गेले? हा प्रश्न चर्चेत आला असून या गुप्तधनाचे गुपित कधी उघड होणार याची उत्सुकता आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी गावात जानेवारी महिन्यात एका जुन्या वाड्याचे खोदकाम सुरू होते. दरम्यान, भिंतीच्या देवळीत एक घागरभर नाणे असल्याचे मजूरांना आढळून आले. सहा महीने गुप्तधन गुपीत राहिले. पण वाटाघाटीत बिघाडी झाल्याने एकाने तीन दिवसांपूर्वी याची माहिती आष्टी पोलिसांना दिली. पोलिसही गावात पोहचले, पाहणी करून दोघांना चौकशीसाठी बोलावले. मात्र अद्याप ते पोलिसांत गेले नसल्याची माहिती आहे. केली.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी सापडलेल्या गुप्तधनाचा गावभर बोभाटा झाला आहे. पण याची कसलीच कल्पना पुरातत्व आणि आणि महसूल विभागाला नाही. ही माहिती का दडवली गेली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वास्तविक गुप्तधनाबाबत तक्रार आल्यानंतर पुरातत्व व महसूल विभागासोबत पाहणी करणे आवश्यक आहे. पण असे होताना दिसले नाही. यामुळेच पोलिस, महसूल आणि पुरातत्व अशा या तिन्ही विभागाने गावात जाऊन चौकशी करून ते गुप्तधन कोणाला सापडले? किती सापडले? ठेवले की विल्हेवाट लावली? याचा शोध घेणे आवश्यक आहे. तब्बल सहा महिन्यांच्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यान याचा माग घेण्याचे मोठे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे आहे.