बीड : जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सरासरी झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात साधारण १० हजार हेक्टरवर पेरणी व कापूस लागवड झाली आहे.
जून महिन्याच्या सुरूवातीला पहिला पाऊस झाल्यानंतर शेतीच्या कामांना वेग आला होता. पेरणी व लागवडयुक्त शेतीची मशागत झाल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मागच्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावला. पेरणीयोग्य ओल असल्याने शेतकºयांनी वापसे होताच पेरण्या सुरू केल्या.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२५.२० मिमी इतका पाऊस झालेला आहे. त्यामुळे पेण्यांना वेग आला आहे. शिरूर आणि वडवणी तालुक्यातील ५ मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकºयांनी जमिनीतील ओल तपासावी. तसेच कृषी विभागाचा सल्ला घेऊन पेरणी व कापूस लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहेत.
खरीप हंगामात कापूस, सोयबीन, तूर, बाजरी, कडधान्य या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो. आतापर्यंत जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी व लागवड करण्यात आली आहे. शेतकरी पेरणीच्या लगबगीत असून बियाणे व खतांच्या दुकानांवर गर्दी झाली आहे. अद्यापही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.