लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून कृषी विभागाने पेरणी व कापूस लागवडीसंदर्भात संपूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख ९१ हजार हेक्टर इतके अंदाजित क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र असणार आहे. यासाठी बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध राहणार असून गुणवत्ता नियंत्रण व तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय एक व तालुकानिहाय एक अशी एकूण १२ पथके नेमली आहेत.
कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने सुमारे १४ लाख ५० हजार इतक्या बियाणे पाकिटांची मागणी नोंदवली असून आतापर्यंत ६ लाख ५० हजार पाकिटे जिल्ह्यात प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणीचे वेध लागले असून, शेतातील मशागतीच्या कामांना देखील वेग आला आहे. कृषी विभागाने देखील सूक्ष्म नियोजन केले आहे. बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, गुणवत्ता नियंत्रण, बियाणे-खतांचा काळाबाजार रोखण्यासह बनावट बियाणांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने जिल्हाभरात १२ भरारी पथकाची स्थापना केली आहे. जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सायप्पा गवंडे, मोहीम अधिकारी भुजंगराव खेडकर, वजन व मापे निरीक्षक के. ए. दराडे, एस. ए. दराडे, पी. बी. मेने यांचा या पथकात समावेश आहे. याशिवाय तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावरही पथके नेमण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याची गंभीर दखल पथककाडून घेतली जाणार आहे.
महाबीजकडे १७ हजार ९३२ क्विंटल बियाणे उपलब्ध
दरम्यान, कापूस व सोयाबीन ही खरिपातील प्रमुख पिके असून ८३ हजार क्विंटल बियाणे मागवण्यात आले आहे, तर महाबीजकडे १७ हजार ९३२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी देखील घरच्या सोयाबीनची उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून १ लाख ३८ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे पेरणीसाठी तयार ठेवले आहेत. घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला असून जिल्हाभरात सोयाबीन उगवण क्षमता याची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.
पीकनिहाय अंदाजित क्षेत्र
पिकाचे नाव क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कापूस ३ लाख ३२ हजार
सोयाबीन २ लाख ५९ हजार
बाजरी ६४ हजार ४७
मका ८ हजार ४०
तूर ६१ हजार ३०८
मूग २२ हजार २९३
उडीद २७ हजार ६१७
भुईमूग ४ हजार २८४
....
१ लाख ६४ हजार ९९० मे. टन खत जिल्ह्यासाठी मंजूर
८४ हजार ५६६ मे. टन खत मागील वर्षी शिल्लक होते. शेतकरी गटांची स्थापना करुन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदविल्यास थेट बांधावर खत उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात येणार आहे, तर यावर्षीसाठी आवश्यक असणारा खताचा साठा देखील जिल्ह्यात आला आहे. १ लाख ६४ हजार ९९० मे. टन खत जिल्ह्यासाठी मंजूर आहे.
......
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. पेरणीपूर्वी सोयाबीनची उगवण क्षमता तपासावी. खते, बी-बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. काही बियाणे खतांच्यासंदर्भात काही तक्रारी असल्यास कृषी विभागाशी संपर्क करावा.
-सुभाष साळवे, जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी.