पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : मान्सूनपूर्व पाऊस चांगला झालेला असल्याने शेतकरी वर्ग बी-बियाणे व खते खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करीत आहे. याचा फायदा उचलत व्यापारी सोयाबीन बॅग ८०० रुपये ‘ऑन’ने विक्री करीत आहेत. खताचीही कृत्रिम टंचाई करीत जादा दराने खत विकले जात आहे. याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहील असा वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे. मान्सूनपूर्व चांगला पाऊस झाल्याने खरिपासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे खरेदीसाठी एक आठवड्यापासून मोंढ्यात गर्दी केली आहे. तालुक्यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापारी वर्गाकडून सोयाबीन बियाणे बॅग शिल्लक नसल्याचे कारण पुढे करीत ७०० ते ८०० रुपये जादा दराने सोयाबीन बॅग विक्री करीत आहेत, तर युरिया व इतर खतांची कृत्रिम टंचाई करीत ज्यादा दराने खतांची विक्री होत आहे. याची झळ मात्र शेतकऱ्यांनाच बसत आहे.
.....
स्टाॅकचे फलकच गायब
खते व बी-बियाणेच्या दुकानात किती स्टॉक आहे याचा दर्शनी भागात फलक असणे आवश्यक आहे. असे असताना एकाही दुकानात फलक दिसून आला नाही. ज्या दुकानात फलक आहे, त्यावर स्टाॅक व भाव लिहिलेला दिसून येत नाही. याचा व्यापारी फायदा घेत असताना येथील तालुका कृषी अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
----
व्यापाऱ्यांनी बी-बियाणे व खते विक्रीत शेतकऱ्यांची लूट थांबवावी. आपल्या दुकानातील स्टॉक व भाव फलकावर लिहावा. नाहीतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना शेकापच्या वतीने काळे फासण्यात येईल.
- ॲड. नारायण गोले, शेकाप.
....
ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून बी-बियाणे व खतांचे जादा पैसे घेतले असतील, अशा शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. त्यानंतर संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.
-शिवप्रसाद संगेकर, तालुका कृषी अधिकारी, माजलगाव.
....