एकीकडे नागरिक कोरोनाने हतबल झालेले असताना लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच सोयाबीन तेलाचे दर किरकोळ बाजारात १७० रुपये किलोवर जाऊन पोहोचले आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या तेल व संसारोपयोगी वस्तूंच्या चढ्या दराने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
सोयाबीन तेलाच्या ५ लिटरच्या कॅनसाठी ७६० ते ७८० रुपये, तर १५ किलोच्या डब्याचा भाव २५०० रुपयांच्या घरात आहे. गेल्यावर्षी सोयाबीन तेल ८० ते १०० रुपये किलो होते. ते यावर्षी थेट दुप्पटीवर जाऊन पोहोचले आहे. अन्य खाद्यतेलांचे दर उच्चांकी असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक सोयाबीन तेलाला पसंदी देतात. मात्र, तेच आता अधिक महागल्याने अशा बेरोजगारीच्या दिवसात खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
"कोरोनाच्या काळात कामही नाही. यात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तेलाशिवाय फोडणी शक्य नाही. यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित ठेवावेत."
लक्ष्मी जगताप.
गृहिणी, मुडेगाव.