प्रभात बुडूख/
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सोयाबीन काढणीला काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून आहे. सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असून भाव गडगडल्याने शेतकरी चिंतेत आहे. हा दर सरासरी प्रतिक्विंटल ४ ते ५ हजारांनी कमी होऊन ५ ते ६ हजार रुपये इतका कमी झाला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव कमी मिळणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
जिल्ह्याचे मुख्य पीक कापूस हे होते. दरम्यान, सोयाबीनचे उत्पादन व मिळणारा भाव यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. त्यामुळे कापसाचे क्षेत्र घटून सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. मागील महिन्यात ११ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सोयाबीन काढणीला येताच त्याचा भाव घसरला आहे. चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ४ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. दरम्यान, सोयाबीन काढणीला आलेले असताना जिल्ह्यात सर्वदूर संततधार व काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचून राहिलेले आहे. त्याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. नैसर्गिक संकट व भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
...
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)
२०१७ ८२०००
२०१८ ९८०००
२०१९ १२००२१
२०२१ २८४७४८
...
सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल
जानेवारी २०२० ४२७०
जून २०२० ३६७०
सप्टेंंबर २०२० ३६५०
जानेवारी २०२१ ४२१०
जून २०२१ ७९०० ते १००००
सप्टेंबर २०२१ ६२००
...
पाण्यासारखा पैसा ओतला आता काय करू?
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करीत आहे. मागील वर्षी निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणी करावी लागली होती. यावर्षी चांगला भाव येईल या हिशेबाने जास्तीचा खर्च केला आहे. मात्र, सोयाबीन काढणीला आल्यानंतर लगेचच भाव पडतो. त्यामुळे खर्च केलेला पैसा निघतो की नाही हे देखील माहिती नाही. त्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर परिणाम झाला आहे.
-सुनील खंडागळे, शेतकरी
...
कापूस पिकाची लागवड कमी करून यंदा सोयबीनचा पेरा वाढविला होता. फवारणी व काढणीपर्यंत एकरी ४ ते ४५०० रुपये खर्च होतो. त्या तुलनेत यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, भाव पडल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धोका झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्तीचे पडावेत अशी केंद्र व राज्य सरकारची भावना नाही.
-अशोक जगताप, शेतकरी
...
विकण्याची घाई करू नका
ज्यावेळी सोयाबीन काढणी होते, त्यावेळी तातडीने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकण्याची घाई करू नये. योग्य भाव आल्यानंतर घरातील सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणावे
-अडत व्यापारी
..
बाजारात सोयाबीनची होणारी आवक यावर भाव ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन विक्रीसाठी आणल्यानंतर चांगला भाव मिळतो. बाजारातील अंदाज घेत सोयाबीन विक्री करणे शेतकऱ्यांना परवडेल.
-अडत व्यापारी