बीड : शहरातील अनाधिकृत बॅनर हटविण्याची जबाबदारी ही पालिकेची असते. त्यात महत्वाची भूमिका स्वच्छता निरीक्षकांची असते. परंतू सध्या बीड पालिकेच्या प्रवेशद्वारावर चक्क अनाधिकृत बॅनर लावण्यात आलेले आहे. या बॅनरवर चक्क मुख्याधिकारी नीता अंधारे आणि स्वच्छता निरीक्षकांचेच फोटो आहेत. त्यावरून पालिकाच बीड शहराचे विद्रूपीकरण करत असल्याचे दिसत आहे.
बीड शहरातील अनधिकृत बॅनरवरून पालिका आणि पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात होता. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी पदभार घेतल्यापासून शहरातील समस्यांबाबत तक्रारीही वाढल्या होत्या. यातच पोलिसांनीही उडी घेतली होती. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतू पालिका आणि पोलिस या दोघांचाही कसलाच वचक नसल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. कारण सध्या शहरभर अनाधिकृत बॅनर लागले असून पाेलिस व पालिका अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. यात जर एखादा अपघात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनाला धरावे, अशी मागणी बीडकरांमधून केली जात आहे.
पालिकेच्या द्वारावरच अनधिकृत बॅनरपालिकेत प्रवेश करताच समोर असलेल्या दोन खांबाला स्वच्छता निरीक्षकांनी बॅनर लावले आहे. यावर मुख्याधिाकरी नीता अंधारे यांचाही फोटो आहे. यावरून मुख्याधिकाऱ्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर कसलाच वचक असल्याचे दिसत नाही. तसेच कर्मचारीही मनमानी कारभार करत आहेत. पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सध्या बीड शहराची वाट लावली असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.