बीड : राज्यामध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खरीप २०२१ मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये किमान १० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालू सप्ताहात या मोहिमेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न कृषी विभागामार्फत क्षेत्रीयस्तरावर करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. साळवे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, ऊस आदींसाठी खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमीन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामूहिक वाचन करणे, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीजप्रक्रिया करणे, हिरवळीच्या खतांचे बियाणांच्या अनुदानावर वितरण करणे तसेच कृषी सेवा केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जमिनीत सेंद्रिय कर्बची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मिकम्पोस्ट, गांडूळ खत, कम्पोस्ट खताचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे, तसेच विविध पीक योजनांतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन केले जात आहे. यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे यांनी केले आहे.