बीड: हैद्राबाद येथे भारत- ऑस्ट्रेलियाच्या संघात सुरू असलेल्या २०-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चौघांना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही करवाई ईटकूर (ता. गेवराई) येथे २५ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता करण्यात आली. प्लुटो अॅपद्वारे सट्टा घेतला जात होता, असे चौकशीत समोर आले. सट्टा खेळविणाऱ्या तिघांसह सात जणांवर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांना या सट्टा जुगाराची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकप्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सहकाऱ्यांसह छापा टाकला. यात जुबेर आबेद पठाण ,सुदाम गणेश दुधाळ,नशीर युसूफ पठाण (तिघे रा.मादळमोही ता. गेवराई), जयदत्त भाऊसाहेब बनसोडे (रा. कोळगाव ता. गेवराई) या चौघांना रंगेहात पकडले. या चौघांकडे केलेल्या चौकशीत सट्टा घेणाऱ्या संदीप गोपीचंद भोपळे , जलील अहेमद शेख (दोघे रा. मादळमोही ता.गेवराई), हितेश (रा. बीड) या तिघांनाही आरोपी केले.
ईटकूर शिवारात जमील अहेमद शेख याच्या शेतात एका पत्र्याच्या बंद शेडमध्ये हा अड्डा सुरू होता. प्लूटो टीव्ही अॅपद्वारे हा सट्टा सुरू असल्याचे उघड झाले. रोख १८ हजार ४३० रुपये, ५५ हजार रुपयांच्या दोन दुचाकी,१० मोबाइल असा एकूण एक लाख २ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक निरीक्षक विलास हजारे, पो.ना. शिवदास घोलप, विकास काकडे, अंमलदार किशोर गोरे, विनायक कडू, बालाजी बास्टेवाड , चालक गणपत पवार यांनी कारवाई केली आहे.