- सतीश जोशी
बीड : बीड जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे काम २०२२ पर्यंतही पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या मार्गावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे धावेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बीडच्या जाहीर सभेत दिले होते. अतिशय संथगतीने हे काम चालू असून २०२० साल उजाडले तरी ५० टक्केही काम पूर्णत्वास गेलेले नाही.
या रेल्वेमार्गास फेब्रुवारी १९९७ मध्ये मान्यता देण्यात आली, तेव्हा रेल्वेमार्ग प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च हा २२७१ कोटी ५० लाख इतका होता. जास्तीत जास्त २०२१ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे ठरले होते. मध्य रेल्वे विभागाने कामासंदर्भात डिसेंबर २०१९ चा मासिक अहवाल दिला आहे. त्यात हा मार्ग मार्च २०२२ पर्यंत जवळपास पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. या अहवालाप्रमाणे आतापर्यंत ६० टक्के काम झाले असल्याचे म्हटले आहे. २३ वर्षांपासून या मार्गाचे काम रेंगाळत चालल्यामुळे प्रस्तावित खर्चही २२०० कोटीवरून ३७१२.५० कोटीपर्यंत जाईल, असेही मध्य रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. म्हणजे १४४१ कोटी रुपयांनी खर्च वाढण्याची शक्यता आहे. काम रेंगाळत गेले आणि असाच खर्च वाढत गेला तर निधी मिळण्यासही भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
जेव्हा रेल्वेमार्गाचे काम प्रत्यक्ष करण्याचे ठरले तेव्हा अंदाजित खर्च २८२६ कोटी एवढा होता. रेल्वे बोर्ड आणि महाराष्टÑ शासनाने प्रत्येकी ५०-५० टक्के खर्च करण्याचे ठरले. बीड जिल्ह्याच्या नशिबाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आले आणि निधी मिळत गेला. आतापर्यंत जवळपास २४७० कोटी ७३ लाख इतका खर्च झाला असल्याचे रेल्वेच्या डिसेंबर १९ च्या मासिक अहवालात म्हटले आहे. या अहवालाप्रमाणेच झालेल्या ६० टक्के कामावर हा खर्च झाला असून मार्च २२ पर्यंत काम पूर्ण होईल, असे गृहीत धरले तरी आणखी १४४१ कोटी रुपये निधी आवश्यक आहे.
जवळपास २६० कि.मी अंतरापैकी नारायणडोह ते सोलापूरवाडी ह्या ३५ कि.मी. मार्गाचे काम पूर्ण झाले असून चाचणीही झाली आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते नारायणडोह हे १२.२७ कि.मी.चे काम २९ मार्च १७ रोजी पूर्ण झाले. दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे नारायणडोह ते सोलापूरवाडी हे २३.२६ कि.मी. अंतराचे काम आणि चाचणी २५ फेब्रुवारी १९ रोजी यशस्वी झाली. सोलापूरवाडी ते आष्टी या १३.६ कि.मी. ट्रॅक लिंकींगचे काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी खासगी तर काही ठिकाणी वन खात्याच्या जमिनीचे भूसंपादन करताना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामात अडथळा येत आहे.
पाठपुरावा चालूच आहे - प्रीतम मुंडेकाम सुरु केले तेव्हा या मार्गाकरिता २ हजार ८२६ कोटी एवढा खर्च अंदाजित होता. पैकी एक हजार ४१३ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या स्तरावर घेतलेला होता. राज्य सरकारने हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०१९-२० करिता मागणी केलेल्या रकमेपैकी ६३ कोटी रुपये नुकतेच रेल्वे विभागाला वितरित केले आहेत. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पंकजाताई आणि माझा प्रयत्न चालू असल्याचे बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.