बीड : भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्यानंतर खाली पडलेल्या चिमुकलीचा मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर घडली. या प्रकरणी कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उद्धव भानुदास चंदनशिव (रा.मित्रनगर, बीड) हे सकाळी आपल्या दुचाकीवरून वायभटवाडीकडे दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची नऊ वर्षांची नात किमया अमर देशमुख होती. राष्ट्रवादी भवनासमोर त्यांच्या दुचाकीला इंदौरहून सोलापूरकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र.एम.एच.१२.ओ.८१४३) धडक दिली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली किमया ही खाली पडली. यावेळी कंटनेर चालकाने ब्रेक न दाबल्यामुळे ती कंटेनरच्या मागच्या चाकाखाली आली. यात किमया जागीच ठार झाली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून, घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. दरम्यान, किमया देशमुख ही औरंगाबाद येथील असून, ती काही दिवसांपूर्वी आपल्या आजोबांकडे आलेली होती. किमयाचे आई-वडील डॉक्टर असल्याचे सांगण्यात येते. या अपघातात उद्धव चंदनशिव हेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंटेनर पंचनामा करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उभा करण्यात आला आहे.