संडे स्पेशल बातमी
संतोष स्वामी
दिंद्रुड : जवळपास ३५ वर्षांपूर्वी दिंद्रुड हे पानमळ्याचे गाव म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते. येथील पानाला विशेष चव असल्याने ग्राहकांत मोठी मागणी दिंद्रुडच्या गावरान पानाला होती. मात्र १९८२ झाली हिंगणी येथे सरस्वती पाझर तलाव झाल्यापासून दिंद्रुडच्या सरस्वती नदीचे पाणी गायब झाले. पर्यायाने पानमळे संपुष्टात आले. दिंद्रुड येथील युवा शेतकरी संजय शिंदे यांनी चालू केलेल्या पानमळ्यामुळे जुन्या आठवणी ताज्या तर झाल्या त्याचबरोबर दिंद्रुडच्या मातीत पुन्हा पानमळ्याचे वैभव फुलण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
काही काळापूर्वी दिंद्रुड हे पान मळ्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गाव म्हणून सुपरिचित होते. मध्यंतरीच्या काळात पाण्याचा दुष्काळ व ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिल्यामुळे या पानमळा शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. पर्यायाने पानमळ्याची शेती नामशेष झाली. दिंद्रुड येथील तरुण शेतकरी संजय शिवाजी शिंदे यांनी पारंपरिक शेती जोपासण्यासाठी पानमळ्याच्या माध्यमातून उत्पन्न साधण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरात तब्बल ३० वर्षांच्या खंडानंतर शिंदे यांनी धाडस करीत चार महिन्यांपूर्वी एक एकर पानमळा लागवड केली. त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार अत्यल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणारी शेती म्हणजे पानमळा असल्याचे ते सांगतात. सेंद्रिय खतावर व अर्धा एकर शेततळे घेत ठिबक सिंचन करून त्यांनी पानमळा जोपासला आहे. त्यांच्या पान मळ्याच्या शेतीला भरघोस उत्पन्न मिळत आहे. अलीकडच्या काळात दिंद्रुड शिवारात भरपूर पाऊस झाला आहे. गावालगत नदीवर बंधारे बांधण्यात आले असून जलसंधारणाचे काम झाले आहे. त्यामुळे गावात पाण्याचा टक्का वाढला असून पानमळे लागवड करण्यासाठी पर्याप्त पाणी उपलब्ध होत आहे. याच कारणाने अन्य शेतकऱ्यांनीही शिंदे यांचा आदर्श डोळ्यासमोर घेत पानमळे शेतीकडे वळणे गरजेचे आहे.
आरोग्यदायी पान
पान खाणे ही वाईट सवय नसून विड्याचे पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. हे खरंय की, पानात जर चुना किंवा तंबाखू मिसळून खाल्ला तर ते तब्येतीसाठी चांगले नसते. पण पानात हे पदार्थ न टाकता काही विशिष्ट पदार्थ टाकून ते खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपले संरक्षण करू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे.
-------
विक्रेत्यांची सोय
यापूर्वी स्टॉल चालवताना परभणी, माजलगाव, बीड आदी ठिकाणाहून पाने आणावी लागत होती. परंतु दिंद्रुड येथील शिंदे यांनी लागवड केलेल्या पानमळ्यामुळे आता पानाच्या खरेदीसाठी गावाबाहेर जाण्याची गरज राहिली नाही. यामुळे प्रवासाचा खर्च वाचला असून येथील पानाला चांगली असल्याने ग्राहकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. - निवृत्ती वरपे, पान स्टॉल चालक. ---------
दुष्काळाच्या अनुभवातून शेततळे
माझ्या आजोबा, पणजोबाच्या काळापासून आमच्या शेतात पानमळा होता. वडिलांनीही तो वसा जोपासला. मात्र पाण्याच्या दुष्काळामुळे पानमळ्याची शेती बंद करावी लागली. आता मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहावा म्हणून मी अर्धा एकर जागेत शेततळे उभारले आहे. भविष्यात मळ्यात कलकत्ता जातीचे पान उत्पादनाचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. - संजय शिंदे, शेतकरी, दिंद्रुड.
130821\4518img_20210620_112245_14.jpg~130821\4518img_20210620_112958_14.jpg