सोमनाथ खताळ, बीड :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांना पदावरून बाजूला करत केजचे तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख पद दिले. त्यांनी मंगळवारी वडवणीत तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. परंतू विद्यमान पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. या निमित्ताने वडवणीतील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंचे नेतृत्व नाकारल्याचे दिसत असून ठाकरे गटातील फुटही उघड झाली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा आरोप करणारे आप्पासाहेब जाधव यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर या पदावर येण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होती. यात केजचे तालुकाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची वर्णी लागली. त्यांनी मागील काही दिवसांपासून तालुकानिहाय बैठका घेणे सुरू केले आहे. मंगळवारी वडवणी तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही करण्यात आले होते. परंतू या बैठकीला विद्यमान पदाधिकारीच गैरहजर होते. माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीच रत्नाकर शिंदे यांचा सत्कार केला. शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत वडवणीतून काढता पाय घेतला. याबाबत जिल्हाप्रमुख शिंदे यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
हे पदाधिकारी होते गैरहजर
वडवणीचे तालुकाप्रमुख संदीप माने, शहरप्रमुख विष्णू टकले, तालुका संघटक बालासाहेब बादाडे, ज्येष्ठ नेते बंडू जाधव, तालुका समन्वयक महादेव मस्के, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब शेंडगे, उप तालुकाप्रमुख सोमनाथ मस्के, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख दिनेश जाधव, विधानसभा संघटक बालासाहेब शेंडगे, जिल्हा सह संघटक बाबासाहेब चाटे, चिंचोटी सरपंच माऊली गोंडे, उपतालुकाप्रमुख शिवाजी सावंत, उपशहर प्रमुख संजय जोशी, शहर संघटक रमेश कुरकुटे, शहर समन्वयक ज्ञानेश्वर पाटोळे, चिखल बीडचे मदन नेटके, कवडगाव सर्कल प्रमुख दत्ता चाळक आदी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला पाठ फिरवली. केवळ उपजिल्हाप्रमुख ढगे हे एकमेव पदाधिकारी बैठकीला हजर होते.
आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस
तालुकाप्रमुख संदीप माने हे जाधव यांच्या गटाचे असून माजी तालुकाप्रमुख विनायक मुळे हे रत्नाकर शिंदे गटाचे आहेत. यापूर्वीही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सन्मान सोहळ्यात मुळे यांनी जाधव आणि माने यांचे नाव व फोटे बॅनरवरून वगळले होते. आता मंगळवारीही मुळे यांनीच या बैठकीचे नियोजन केले होते. यानिमित्ताने वडवणीतील ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवाय शिंदे यांच्याविरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये रोष असल्याचेही स्पष्ट झाले आहे.