बीड : क्रीडा विभागाकडून तालुकास्तरीय समितीची बैठक न झाल्यामुळे दीड वषार्पासून धारुर क्रीडा संकुलाचे काम अर्धवट अवस्थेत रेंगाळले आहे. यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. मागील पाच वर्षांपासून तालुका क्रीडा अधिकार्याचे पद रिक्त असल्यामुळे ही दुरवस्था झाली आहे.
धारूर येथे क्रीडा विभागाच्या वतीने दोन वषार्पूर्वी क्रीडा संकूल बांधकामासाठी ३८ लक्ष रुपये निधी मंजूर झाला होता. चिरका मैदान येथे या संकुलाचे बांधकाम करण्यात येणार होते. सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत ई - निविदा काढून केज येथील बी. ए. कादरी या गुत्तेदारास काम मिळाले होते. दीड वषार्पूर्वी संकुल कामास सुरुवातही झाली. ५० टक्क्यांच्या जवळपास कामही झाले होते.
सदर बांधकामाचा निधी हा तालुका क्रीडा समितीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला वितरीत करण्यात येतो. पूर्वी या समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी होते. नंतर बदल होवून स्थानिक आमदार अध्यक्ष झाले आहेत. त्या समितीचा धमार्दाय कार्यालयाकडून चेंज रिपोर्ट करण्याची गरज होती परंतु तो अद्याप करण्यात आलेला नाही. बांधकामासाठी निधी वितरीत करण्यासाठी तालुकास्तरीय समितीची बैठक होणे आवश्यक असते. समितीची बैठकच झाली नसल्याने गुत्तेदारास बिल मिळाले नाही. चेंज रिपोर्ट करुन बैठक घेण्यास क्रीडा विभागाची उदासिनता दिसून येत आहे.
चेंज रिपोर्टच नाहीया संदर्भात क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना संकुल कामाबाबत काहीच माहिती नसल्याचे समोर आले. या महिन्याअखेर बैठक घेवून काम सुरु करु असे त्यांनी सांगितले. तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी समिती बदलाचा चेंज रिपोर्ट अद्याप झाला नसल्याने निधी वितरणास अडचण असल्याचे सांगितले.
निधी अभावी काम बंद
या बाबत गुत्तेदार कादरी म्हणाले, संकुलाचे पन्नास टक्के काम झाले आहे. निधी मिळत नसल्याने सहा महिन्यांपासून काम बंद करण्यात आले. कामाचे पैसे मिळताच उर्वरित काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल . दरम्यान क्रीडा संकुलाचे काम बंद झाल्याने खेळण्यासाठी व सराव करण्यासाठी खेळांडूना मैदान राहिलेले नाही. त्यांची गैरसोय होत आहे. या क्रीडा संकुलाची फरफट थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही.