-------------
पिकांवर आले रोगराईचे संकट
अंबेजोगाई : तालुक्यात गेल्या एक आठवड्यांपासून दररोज ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, मूग या पिकांना रोगराईचा फटका बसू लागला आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे. वातावरणात असे बदल झाल्यानंतर शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके पिकांवर फवारावी लागतात. या औषधांचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना होत आहे.
-------
ग्रामीण भागात पथदिव्यांचा अभाव
अंबेजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात अनेक खेड्यांमध्ये अघोषित भारनियमन सुरूच आहे. यामुळे नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात असणारे बहुतांश पथदिवे बंद स्थितीत राहतात. परिणामी, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण भागात यापूर्वीही अंधाराचा फायदा घेऊन, अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पथदिवे, वीजपुरवठा सुरू करून ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.
-----------
सुविधांअभावी खवा उद्योग अडचणीत
अंबेजोगाई : खवा व्यावसायिकांना शासनाकडून सोईसुविधा, तसेच सवलती शासनाकडून मिळतात. मात्र, तालुका स्तरावर खवा व्यावसायिक या संदर्भात कारवाई करण्यासाठी गेल्यास त्यांना टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जातात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भट्ट्यांऐवजी मशीनद्वारे खव्याची निर्मिती होती. मात्र, ही मशनरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी, जुन्याच भट्ट्यांवर खवा उद्योग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.
--------
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबेजोगाई : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखविला जातो, अन्यथा ते मास्क चढ्या भावाने विक्री केले जातात. दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे.
------------