माजलगाव : तालुक्यातील उमरी येथील शेतमुजराचा मुलगा दहावी परिक्षेत सर्व विषयात ३५ गुण घेऊन उतीर्ण झाला आहे. धनंजय नारायण नखाते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अनोखा पराक्रम केलेला धनंजय जिल्ह्यातील पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तालुक्यातील उमरी येथील शेत मजुर नारायण नखाते यांना तीन मुले आहेत. दोन मुले शेतमजुरी करतात तर धनंजय हा गावातील रामेश्वर विद्यालयातमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता. त्याला कसल्याही प्रकारे खाजगी शिकवणी नव्हती. विशेष म्हणजे तो शाळेच्या सुटीमध्ये आई-वडिलांसोबत शेतमजुरीसाठी जात असे. अशा परस्थितीत धनंजयने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले आणि तो दहावी उत्तीर्ण झाला. यासोबतच त्याने सर्व विषयात ३५ टक्के गुण घेऊन अनोखा विक्रम केला. धनंजयच्या या यशाने त्याने स्वतःसह गावाचे नाव ही मोठे केल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असुन त्यांनी त्याचे कौतुक केले आहे.